यवतमाळ : ‘चहाच्या मळ्यात वरच्या तीन कोवळ्या पानांपासूनच चहा तयार होतो, पण उरलेल्या पानांचे काय ? ती वाया जात होती. या उरलेल्या पानांपासून बायोडिझेल तयार करायचा प्रयोग यशस्वी करून दाखवू शकलो. त्यामुळे डॉ. एपीजे अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर अशा महान शास्त्रज्ञांसोबत काम करायला मिळाले. त्यांनी मला कधीही दहावी, बारावी किंवा पदवीचे गुण विचारले नाही, तर मी काय केले आहे ते विचारले. गुणांपेक्षा गुणवत्ता ही नेहमीच महत्त्वाची असते.’ असा संदेश युवा वैज्ञानिक अजिंक्य कोत्तावार याने विद्यार्थ्यांना दिला. ‘हवी एक वैज्ञानिक दृष्टी’ या विषयावर अजिंक्य कोत्तावार या युवा वैज्ञानिकाने आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.
एनसीईआरटी व प्रादेशिक विद्या प्राधिकरणद्वारा पुरस्कृत तथा जिल्हा परिषद शिक्षण विभाग व विशुद्ध विद्यालयद्वारा संचालित विवेकानंद व राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या वतीने आयोजित ५० व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तो बोलत होता. वैज्ञानिक होण्यासाठी चिकित्सक वृत्ती असावी लागते. आपल्याला खूप सारे प्रश्न पडावे लागतात. असे प्रश्न पडणे आणि त्यांची उत्तरे शोधणे यासाठी कोणताही अभ्यासक्रम नाही. त्यासाठी हवी असते ती शोधक वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टी, असे अजिंक्य म्हणाला.
हेही वाचा – नागपूर: परीक्षेच्या काळात मुले अभ्यासाचा कंटाळा करतात; पालकांनो ही युक्ती वापरून बघा
परीक्षेत किती गुण मिळाले यापेक्षाही अधिक आपल्याला ते किती समजले आणि त्याचे उपयोजन किती करता आले हे महत्त्वाचे असल्यामुळे कौशल्याकडे लक्ष द्या, असा सल्लाही अजिंक्यने विद्यार्थ्यांना दिला.
पाटणबोरी येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर यवतमाळच्या विवेकानंद विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर नागपूर आदी शहरांमध्येही गेलो. प्रत्येक ठिकाणी शिकताना आपण सामान्य विद्यार्थीच होतो. मात्र, लहानपणापासूनच प्रश्न पडत गेले आणि त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी मी वेगवेगळे प्रयोग करत गेलो. या प्रयोगातूनच आणि मला घरून मिळालेल्या कोणतीही गोष्ट वाया जात नसते, जाऊ द्यायचे नसते या शिकवणुकीतून प्रत्येक गोष्टीचा उपयोग कसा करता येईल, याचा विचार करायला लागलो, असे अजिंक्य म्हणाला.
मुलांना छोटे छोटे प्रयोग करू द्या. त्यांचे चुकत असेल तरी चुकू द्या. चुकांतूनच मुले शिकत असतात आणि करून पाहिल्यामुळेच त्यांना अधिक कळत असते, असा सल्ला अजिंक्यने शिक्षक व पालकांनाही दिला. संशोधक वृत्तीमुळेच आपल्या नावावर ३० पेक्षा अधिक पेटंट असल्याचेही त्याने यावेळी सांगितले. इन्व्हेन्शन इतकेच इनोव्हेशनलाही महत्त्व असते, असेही तो म्हणाला. यावेळी विवेकानंद शाळेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी त्याला गराडा घालून अनेक प्रयोगांबद्दल विचारले व सेल्फीही घेतली.