यवतमाळ – झरी तालुक्यातील गणेशपूर येथे  सूर्या केमिकल्स या कंपनीचे छत कोसळून सहा  कामगार त्याखाली दबले. यात एका तरूणीचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. गंगा कंवर (२०, राजनांदगाव, छत्तीसगड) असे मृत तरूणीचे नाव आहे. जखमी झालेले सर्व कामगार हे छत्तीसगडमधील आहेत. ही घटना  गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

गणेशपूर येथे सूर्या केमिकल ही कंपनी आहे. ही कंपनी व्हाईट वॉश व बांधकाम साहित्याचे  उत्पादन करते. या कंपनीत परप्रांतीय मजूर कामगार काम करतात.  सकाळी नेहमीप्रमाणे मजूर कंपनीत  काम करत असताना कंपनीच्या इमारतीचे एक छत अचानपणे कोसळले. यात काम करणारे मजूर दबल्या गेले. घटना घडताच कंपनीत एकच हलकल्लोळ उडाला. घटनेची माहिती झरी पोलिसांना देण्यात आली. कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी बचावकार्य सुरू करून मलब्याखाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढून जखमींना वणी येथे उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार मिळण्यापूर्वीच गंगा कंवर या मजूर तरूणीचा मृत्यू झाला. इतर जखमी मजुरांवर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर परिसरात खळबड उडाली. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. मृत व जखमी मजूर छत्तीसगड राज्यातील असल्याने त्यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीनेही या घटनेची माहिती घेण्यात आली. सूर्या केमिकल कंपनीचा मालक आंध्रप्रदेशोतील असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

झरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या खनिजांमुळे येथे सिमेंट आदी उद्योग स्थिरावले आहे. बहुतांश कंपनी सिमेंट, चुनखडी आदींचे उत्पादन घेतात. या कंपन्यांमध्ये स्थानिकांपेक्षा परप्रांतीय मजुंराचा भरणा अधिक असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. कंपनीत परप्रांतीय मजुरांना मोठ्या प्रमाणात राबवून घेतले जात असल्याचा आरोपही या घटनेनंतर अनेक कामगारांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यवतमाळच्या घटनेची पुनरावृत्ती

दोन महिन्यांपूर्वी एप्रिल महिन्यात यवतमाळ येथील लोहारा एमआयडीसी परिसरात असलेल्या मनोरमा दालमिलमध्ये डाळ साठवणुकीचा डोम कोसळून तीन कामगार ठार झाले, तर दोघेजण गंभीर जखमी झाले होते. याच घटनेची पुनरावृत्ती झरी येथील सूर्या केमिकल कंपनीत घडल्याची चर्चा आहे. कंपन्यांच्या स्थापनेनंतर त्यांच्या इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी या‍ अपघानंतर पुढे आली आहे. सूर्या कंपनीतील घटनेस जबाबदार व्यक्तींसह मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.