अमरावती : गेल्या अनेक दिवसांपासून तरुणीचा पाठलाग करून तिच्यासोबत सलगी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाने महाविद्यालयात जाऊन तिचा विनयभंग केला आणि मारहाणही केल्याची धक्कादायक घटना येथील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रारीच्या आधारे राहुल वानखडे (२२, रा. जेवड नगर, अमरावती) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित युवती ही शहरातील एका महाविद्यालयात शिकते. ती महाविद्यालयात ये-जा करीत असताना गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी राहुल वानखडे हा तिचा पाठलाग करीत होता. ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’, असे तो म्हणत होता. पीडित युवती आरोपीला टाळत होती. तिने त्याला स्पष्ट शब्दात नकार कळवला. पण, आरोपी जिद्दीला पेटला होता.
हेही वाचा – सैन्यदल अधिकाऱ्यांच्या गणवेशात होणार बदल
पीडित युवती ही महाविद्यालयामध्ये परीक्षा देण्यासाठी गेली असता राहुल याने तिच्या वर्गात जाऊन शिवीगाळ केली आणि मारहाण केली. युवतीचा विनयभंग केला. तिला वर्गातून बाहेर खेचत आणले, बाहेर युवतीचे वडील होते, त्यांनादेखील आरोपीने शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. यावेळी आरोपीने पीडित युवतीला ओढाताण करून खाली आपटले आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पीडित युवतीने राजापेठ पोलीस ठाण्यात पोहोचून आरोपी राहुल वानखडे याच्या विरोधात तक्रार दाखल केली.