नागपूर : आईने थोरल्या मुलासोबत जेवन केले आणि घराबाहेर गप्पा करीत बसली. तेवढ्यात लहान मुलगा घरी आला. त्याला मोठ्या भावाने उशिरा येण्याचे कारण विचारले. त्याने उलटसुलट उत्तर देऊन टाळाटाळ केली. त्यामुळे भावाने रागावले आणि पटकन जेवन करुन झोपण्यास सांगितले.त्यामुळे चिडलेल्या भावाने मोठ्या भावाशी वाद घातला आणि घरातून विळा आणून आईसमोरच त्याचा गळा चिरला. पोटचा मुलगा क्षणार्धात रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्यामुळे आईने हंबरडा फोडला आणि मदतीसाठी शेजाऱ्यांनी धाव घेतली.

मात्र, तोपर्यंत गंभीर जखमी युवकाने प्राण सोडला होता. अखेर पोटच्या तरुण मुलाच्या आईच्या डोळ्यासमोरच श्वास थांबला. ही थरारक घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री घडली. राजू कुंभलाल यादव (३०) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून मुलगा विजय यादव (२३) याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

गुलशननगर येथील रहिवासी रमा यादव (६०) यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. मुलगी शेजारीच राहाते. राजू हा मजुरी करायचा तर राजेश कळमना बाजारात मिरची व्यापाऱ्याकडे काम करतो. विजय हा वस्तीत फिरून टवाळक्या करतो.  मंगळवारी रात्री सर्वजन घरी होते. आई जेवन करून नातीसोबत गप्पा मारत होती.राजू हा सुध्दा जेवन करून बसला होता. त्याच वेळी विजय घरी आला. राजूने त्याला जेवन करून घे, असे म्हटले. यावरून त्याने राजूला शिवीगाळ केली. अचानक तो सुडाने पेटला. मोठ मोठ्याने ओरडून तो शिवीगाळ करीत होता. यावरूनच दोन भावात वाद पेटला. वाद विकोपाला जाताच विजयने स्वयंपाक घरातून विळा आणला आणि राजूच्या छाती आणि डोक्यावर वार करून त्याला रक्तबंबाळ केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आईने आरडा ओरड केली तर नातीनही रडत घरी गेली. वडिलांना बोलावून आणले. जखमी अवस्थेत राजूला मेयो रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी  मृत घोषित केले. माहिती मिळताच कळमना पोलिसांचे पथक मेयो रूग्णालयात पोहोचले. कुटुंबीयांचे जबाब नोंदवून तक्रारीवरून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला. काही वेळातच आरोपी विजयला अटक केली. त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आले. शवविच्छेदनानंतर पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. या हत्याकांडानंतर नातेवाईकांची घरी गर्दी झाली. रमा या धाय मोकलून रडत होत्या. त्यांचा मोठा मुलगा मृत पावला तर लहान मुलगा कारागृहात जाणार होता. रमा यांना शेजारी राहणाऱ्या मुलीने स्वतःच्या घरी नेले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.