गोंदिया: अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे भरधाव रुग्णवाहिकेने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवर बसलेला एक युवक ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास कोहमारा-अर्जुनी मोरगाव राज्य मार्गावरील देवलगाव शिवारात घडली. तारेश मनोहर सांगोळकर (वय २५) रा. नवेगावबांध असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे तर अनिल पुरुषोत्तम मेश्राम असे जखमी युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तारेश व अनिल हे दोघेही मित्र दुचाकीने बाहेर जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान ते देवलगाव येथील रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून उभे होते. याच दरम्यान भरधाव रुग्णवाहिकेने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.धडक एवढी जोरदार होते रुग्णवाहिकेने दुचाकीला जवळपास १०० मीटर फरफटत नेले. यात तारेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अनिल गंभीर जखमी झाला. दुचाकीला धडक दिल्यानंतर रुग्णवाहिका चालक रुग्णवाहिकेसह घटना स्थळावरून पसार झाला.

रस्त्यावर असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तसेच या घटनेची माहिती नवेगावबांध पोलिस स्टेशनला दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तसेच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णवाहिकेचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली. या अपघातप्रकरणी नवेगावबांध पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. जखमी अनिलवर ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तारेश चालवित होता मार्गदर्शन वर्ग

तारेश हा नवेगावबांध येथे मित्रांबरोबर खुणे वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग चालवत होता. समाजाभिमुख वृत्ती असलेल्या या तरुणाच्या अपघाती निधनाने सांगोळकर कुटुंबियांवर दुखाःचा डोंगर कोसळला तर संपूर्ण गाव त्याच्या मृत्यूने हळहळले.

मुंडीपार जवळ ट्रक अपघात : चालक ठार

गोंदिया-कोहमारा महामार्गावरील मुंडीपारजवळ लोखंडाने भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन अपघात झाला. या घटनेत ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजता मुंडीपार जंगल शिवारात घडली . या घटनेत गोरेगाव तालुका मधील चोपा येथील रहिवासी ट्रक चालक संजय गणेश सहारे यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मृताला ट्रकच्या केबिनमधून बाहेर काढण्यात आले. गोरेगाव पोलिसांनी प्रकरण नोंद केले.