नागपूर : अंबाझरीतील कॅफेसंचालक अविनाश भुसारी हत्याकांडात सहभाग असल्याचा संशय आल्याने गुन्हे शाखेने एका युवकाला सूचनापत्र देऊन चौकशीसाठी बोलावले. चौकशी केल्यानंतर त्याला सोडून दिले. मात्र, त्या युवकाने मावशीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आभास ऊर्फ आबू महेश क्षीरसागर (२६, रामनगर, अंबाझरी) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आबू क्षीरसागर हा अविनाश भुसारी याचा बालपणीचा मित्र होता. तसेच हिरणवार टोळीचा सदस्य शक्ती यादव याचाही मित्र होता. शेखू खान आणि हिरणवार टोळीशी आबूचे मैत्रीपूर्ण संबंध होते. तो एका कॅफेेमध्ये काम करीत होता. अविनाश भुसारी याचा १४ एप्रिलला बंटी हिरणवार आणि शक्ती यादव यांनी गोळ्या घालून खून केला.
अविनाश हा सोशा कॅफेसमोर उभा आहे, ही टीप आबू क्षीरसागर याने दिली होती, अशी चर्चा होती. अविनाशच्या हत्याकांडात आतापर्यंत १३ आरोपी पोलिसांनी जेरबंद केले. मात्र, टीपर म्हणून संशयित आबूला गुन्हे शाखेने अंबाझरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले होते. त्याला पोलिसांनी सूचनापत्र दिल्यामुळे आबू घाबरला होता. पोलिसांनी त्याची चौकशी करुन सोडून दिले आणि पोलिसांनी बोलावले तेव्हा हजर होण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते. पोलिसांच्या चौकशीमुळे आबू घाबरला होता. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईच्या भीतीमुळे त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. गुन्हे शाखा आणि अंबाझरी पोलिसांनी अबूला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे पोलिसाच्या मारहाणीला कंटाळूनच त्याने आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे
मावशीच्या घरात घेतला गळफास
आबू क्षीरसागर हा मंगळवारी खापरी पुनर्वसन येथे राहणाऱ्या मावशीकडे गेला. त्याने चहा घेतल्यानंतर मावशीला वरच्या खोलीची चाबी मागितली. तो आराम करीत असल्याचे सांगून खोलीत गेला. दुपारी चार वाजता मावशी त्याला उठविण्यासाठी गेली असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. मावशीने आरडाओरड करीत शेजाऱ्यांना आवाज दिला. आबूला एम्स रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले.