नागपूर : समता, स्वावलंबन, त्याग, वक्तशीरपणा, समर्पण, सत्य आणि श्रमाचे मोल ही सगळी मूल्ये आजच्या तरुणांमध्ये आहेत. त्यांना सामाजिक जाणिवांसह समाजकार्याची ओढही आहे. मात्र, अभाव आहे तो योग्य संधीचा. सामाजिक संस्था, विविध सामाजिक प्रश्नांचा प्रचार आणि प्रसार कमी होत असल्याने अनेकांपर्यंत मूळ प्रश्न आणि सामाजिक संस्थांचे काम पोहचत नाही, असे स्पष्ट मत वंचितांच्या न्यायासाठी ‘पाथ फाऊंडेशन’च्या माध्यमातून लढा देणाऱ्या दीपक यादवराव हेमलता चटप यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता  त्यांनी संस्थेच्या कार्याविषयी व विविध सामाजिक प्रश्नांविषयी चर्चा केली.  नुकतीच त्यांची ब्रिटिश सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या ‘चेव्हेनिंग’ या जागतिक आणि प्रतिष्ठेच्या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली.

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
bjp leader ganesh naik campaign for his son sanjeev naik
गणेश नाईकांची पुत्र संजीव नाईकांसाठी मिरा-भाईंदर मध्ये मोर्चे बांधणी, जुन्या समर्थकांना सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

दीपक यांनी सांगितले की, शिक्षणाचा उपयोग सामाजिक बदलांसाठी व्हावा, या हेतूने बोधी रामटेके आणि वैष्णव इंगोले या समविचारी मित्रांसोबत २०१९ ला ‘पाथ फाउंडेशन’ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून तीन टप्प्यांमध्ये काम सुरू केले. यात दुर्बल घटक, शेतकरी व कामगार यांच्या न्याय्यविषयक समस्यांचे संशोधन करणे, न्यायालयात पोहचण्यासाठी येणारे अडथळे दूर करणे आणि कोलाम आणि माळी या समुदायाला त्यांची मूळ कागदपत्रे शोधण्यास मदत करणे असे काम सुरू आहे.  युवकांचे सजग नेतृत्व घडवणे आवश्यक असल्याने मागील वर्षी संविधान नैतिकता अभ्यासक्रम सुरू केला. यामध्ये बाराशे विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेऊन त्यातील उत्तीर्ण  ६५९ युवकांना संविधानाचे धडे दिले. संविधान आणि त्यातील नैतिक अधिकारांची ओळख करून देणे आवश्यक आहे. पद्मश्री अभय बंग यांच्या मार्गदर्शनात निर्माण शिबिरातून दिशा मिळाली.  करोना काळात चंद्रपुरातील ४५० कंत्राटी आरोग्य कामगारांना सात महिन्यांचे वेतन नव्हते. या कामगारांनी डेरा आंदोलन केले. त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केवळ एक रुपया शुल्क घेत मानवाधिकार आयोगात  लढा दिला. कामगारांना वेतन मिळवून दिले. मुंबईतील अरबी समुद्र प्रदूषणाबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणात याचिका दाखल केली. सरकार व हाजी अली दर्गा ट्रस्टने जलप्रदूषणावर उपाययोजना केली. धर्मा पाटील या अन्यायग्रस्त शेतकऱ्याने मंत्रालयात आत्महत्या केली. या प्रकरणावर लढा देऊन शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देत संबंधितांवर कारवाई करण्यास भाग पाडले.

देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष न्यायाधीकरण अस्तित्वात यावे म्हणून कृषी न्यायाधीकरण कायद्याचा मसुदा २०१८ मध्ये तयार केला. लोकसभेत तत्कालीन खासदार राजीव सातव यांच्यामार्फत अशासकीय विधेयक मांडले. २०१७ मध्ये महाराष्ट्राच्या पावसाळी, हिवाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळ सहाय्यक म्हणून काम केले. विद्यमान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमाने राज्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले, असेही दीपक यांनी सांगितले.

काम निरंतर सुरू राहणार

कोरपणा तालुक्यातील ६० कुपोषित बालकांसाठी ‘जाणीव माणुसकीची’ अभियान राबवून पोषण आहार संच व मोफत आरोग्य तपासणीची सोय उपलब्ध करून दिली. शेकडो कोलाम कुटुंबीयांना कारोना काळात अन्नधान्य पुरवले. या कामांमधून जनतेत राहता आले आणि त्यांच्या समस्या अधिक जवळून पाहता आल्या. शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे मी आता लंडनला पुढील शिक्षणासाठी जाणार आहे. परंतु, ‘पाथ फाऊंडेशन’चे काम निरंतर सुरू राहणार, असे त्यांनी सांगितले.