चंद्रपूर: जिल्हा परिषदेतील शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. बहुसंख्य शाळांत दहा ते वीस विद्यार्थीच शिक्षण घेत आहे. शाळांची पटसंख्या कमी होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या शाळा एक ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळांमध्ये समायोजित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. असे झाल्यास वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना टाळे लागण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या ४७५ इतकी आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेअंतर्गत १ हजार ५४२ प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळा आहेत. गेल्या काही वर्षांत खेड्यापाड्यात कॅान्व्हेंटचे लोण पसरले. त्यामुळे प्रत्येकच पालक आपल्या पाल्यांना काँन्व्हेंटमध्ये शिक्षण देऊ लागला आहे. कॅान्व्हेंट संस्कृतीमुळे गेल्या काही वर्षांत मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. दरवर्षी खासगी शाळांना प्रवेशासाठी विद्यार्थी शोधमोहीम राबवावी लागते. आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी शिक्षकांना सायकल, गणवेश, पाठ्यपुस्तकांचे आमीष विद्यार्थी, पालकांना दाखवावे लागत असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्यातरी पालकांनी या शाळांकडे पाठ फिरविली आहे.

हेही वाचा… विघ्नहर्ता बाप्पाला भावपूर्ण निरोप, अकोल्यात पारंपरिक विसर्जन मिरवणुकीचा उत्साह

सध्या जिल्हा परिषदेच्या शाळेत एक लाखांवर विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे असले तरी त्याहून कमी पटसंख्या आहे. मधल्या काळात राज्य शासनाने वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती मागविली होती. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात ४७५ शाळा वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या असल्याचे समोर आले होते. तेव्हापासूनच या शाळांचे समायोजन करण्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, तेव्हा याला विरोध झाला होता. त्यामुळे या शाळांचे लगतच्या शाळांत समायोजन करण्याच्या हालचाली बंद झाल्या. आता पुन्हा वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती मागविण्यात आली आहे. या शाळा आता परिसरात असलेल्या एक ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळांत समायोजित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. असे झाल्यास जिल्ह्यातील ४७५ शाळांना टाळे लागण्याची शक्यता आहे. सगळ्यात जास्त कमी पटसंख्या असलेल्या शाळा वरोरा, राजुरा आणि जिवती या तालुक्यांतील आहेत.

जिल्हा परिषदेअंतर्गत १५४२ शाळा आहेत. यातील ४७५ शाळांमध्ये वीसपेक्षा कमी पटसंख्या आहे. या शाळांचे अन्य ठिकाणी समायोजन करण्याबाबत अजूनही काही परिपत्रक आले नाही. मात्र, स्कूल कॅाम्प्लेक्स ही एक संकल्पना आहे. ती राबविण्याच्या अनुशंगाने आमचे प्रयत्न सुरू आहेत. – राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर.

तालुके, वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा

बल्लारपूर- १३

भद्रावती-४०

ब्रह्मपुरी-१८

चंद्रपूर-३४

चिमूर-४९

गोंडपिपरी-२८

जिवती-४७

कोरपना- ३९

मूल-१७

नागभीड-२१

पोंभुर्णा-१०

राजुरा-५५

सावली-१६

सिंदेवाही-२४

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरोरा-६४