दररोज ८०० नागरिकांचा सायकल प्रवास

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महापालिका आणि हेक्सी सायकल यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सायकल शेअरिंग प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ७० हजार नागरिकांनी ‘हेक्सी अ‍ॅप’वर नोंदणी केली आहे. आतापर्यंत ६५ हजार नाशिककरांनी या सायकल सेवेचा लाभ घेतला असून सुमारे ८०० नागरिक दररोज या प्रकल्पांतर्गत सायकल चालवीत आहेत.

या प्रकल्पांतर्गत एका महिन्यात सुमारे ६८५ किलोमीटर सायकल चालवल्याबद्दल अमोल भोये या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला स्मार्ट सिटीचे अ‍ॅड. प्रकाश थविल यांच्या हस्ते टी शर्ट देऊन गौरविण्यात आले. यापुढेही शहरातील सायकल वापर करणाऱ्यांना विविध पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि शहरातील बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेवर पर्याय म्हणून १०० ठिकाणी सायकल स्थानक तयार करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून एक हजार सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हेक्सीतर्फे हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर राबविण्यात येत आहे. सायकलींना जीपीएस प्रणाली असल्याने त्यांचा किती वापर झाला, ते कळू शकते.

सायकल वापरासाठी तीन योजना आहेत. एक दिवसाच्या ‘पोस्टपेड’ योजनेत २० रुपये, महिन्याला १४९ रुपये, सहा महिन्याला ५९९ रुपये द्यावे लागतात.

या तीनही योजनांमध्ये सुरुवातीचा अर्धा तास मोफत असून पुढील अध्र्या तासासाठी पाच रुपये दर आकारले जात आहेत. नागरिकांना हेक्सी अ‍ॅप आपल्या भ्रमणध्वनीत डाऊनलोड करून सायकल सुविधाचा वापर करता येतो. सायकलचा वापर कसा करावा, याची माहिती प्रत्येक सायकल स्थानकात देण्यात आली आहे. पुढील काळात नाशिक शहरातील शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, शासकीय आणि बिगर शासकीय कार्यालये यांनी पुढाकार घेऊन शरीर स्वास्थ्य, पर्यावरण संवर्धनासाठी सायकल चळवळीस चालना देणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

सायकल शेअरिंग प्रकल्प हा प्रत्येक नागरिकासाठी आहे. त्याचे आपण संवर्धन केले पाहिजे. सायकल कोणीही घरी नेऊ  नये. तसेच सायकलचे नुकसान करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल. नुकसान झालेल्या सायकली जमा करण्यासाठी चार वाहने दररोज शहरात फिरत असतात. सायकल सुविधेचा उपयोग नागरिकांनी करावा आणि या उपक्रमाविषयी सूचना असल्यास ‘हेक्सी सायकल कस्टमर केअर नंबर +९१-७५२८८१०००० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महापालिका आणि हेक्सी सायकल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महापालिका आणि हेक्सी सायकल यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सायकल शेअरिंग प्रकल्पांतर्गत एका महिन्यात सुमारे ६८५ किलोमीटर सायकल चालवल्याबद्दल अमोल भोये या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला स्मार्ट सिटीचे अ‍ॅड. प्रकाश थविल यांच्या हस्ते टी शर्ट देऊन गौरविण्यात आले