‘शेअर रिक्षा’च्या दरपत्रकाकडे दुर्लक्ष 

शहरातील बस व्यवस्था कोलमडली असताना संयुक्तपणे रिक्षा प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, नागरिकांना मोठा भुर्दंड पडतच आहे. मीटरप्रमाणे रिक्षा वाहतुकीची अंमलबजावणी सुरू झाली. प्रादेशिक परिवहन विभागाने ५४ मार्गावर संयुक्तपणे प्रवास करणाऱ्या (शेअर रिक्षा) प्रवाशांसाठीचे दर प्रसिद्ध केले असले तरी हे दर खिजगणतीतही न धरता चालकांनी मनमानीपणे आकारणी सुरूच ठेवली आहे.

राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे शहरातील रिक्षा वाहतुकीला आजवर कधीही शिस्त लागली नाही. प्रवाशांशी अरेरावीपणे बोलणे, मनमानीपणे भाडे आकारणी, क्षमतेहून अधिक वाहतूक, प्रवाशांना नकार देणे अशा एक ना अनेक तक्रारी त्यांच्याविरुद्ध कायम केल्या जातात. वाहतूक पोलिसांना ते जुमानत नाहीत. अनेकदा रिक्षाचालकांनी संबंधितांवर हल्ला केल्याची उदाहरणे आहेत. या स्थितीत १  डिसेंबरपासून शहरात मीटरप्रमाणे रिक्षा वाहतुकीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तत्पूर्वी, पोलीस, आरटीओ विभागाने रिक्षाचालक, मालक संघटनांशी चर्चा केली. शहरात अनेक मार्गावर प्रवासी मीटरऐवजी संयुक्तपणे रिक्षा प्रवास करतात. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने तशा ५४ मार्गाना मंजुरी दिलेली आहे. उपरोक्त मार्गावर पहिल्या किलोमीटरसाठी १४ रुपये आणि नंतरच्या प्रत्येक एक किलोमीटरसाठी १३.७५ रुपये याप्रमाणे एकूण अंतराचे भाडे काढले जाते. हकीम समितीने शेअर ए रिक्षासाठी ३३ टक्के अतिरिक्त भाडे ठरविले आहे. या पद्धतीने नवीन भाडेदराप्रमाणे येणारे भाडे अधिक ३३ टक्के अतिरिक्त भाडे मंजूर ५४ मार्ग निश्चित करण्यात आले. हे एकूण भाडे तीन प्रवाशांमध्ये विभागले जात असल्याने प्रवाशांना त्याचा फायदा होतो, असे शासकीय यंत्रणेचे म्हणणे आहे.

प्रति प्रवासी किती भाडे आकारणी करावी, याचे दरपत्रक पाहिल्यास हे भाडे परवडणारे नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. रिक्षात तीनपेक्षा  कमी प्रवासी असल्यास चालकांनी मीटरप्रमाणे भाडेआकारणी  करावी किंवा तीनपेक्षा कमी प्रवासी असतील तर त्या प्रवाशांनी तीन प्रवाशांचे भाडे द्यावे, असे आरटीओने म्हटले आहे.