दीड ते दोन महिन्यांत ७० रोहित्र जळाले, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची वणवण

नाशिक : महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे बागलाण तालुक्यात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होऊन ग्रामस्थांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे दीड ते दोन महिन्यांपासून तब्बल ७० रोहित्र जळाले आहेत. त्यामुळे शेकडो कृषिपंप बंद आहेत.

बागलाण तालुक्यात यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. त्यातच विहिरींना बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे मका, भुईमूग, बाजरी पिकांचा वेळेवर पेरा झाला आहे. बहुतांश पिकांची कोळपणीही झाली आहे. परंतु, पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांना आता पाण्याची आवश्यकता असतांना विजेअभावी खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेत शिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच जनावरांना कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. विहिरीत पाणी असूनही विजेअभावी हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी बागलाणचे शेतकरी दुष्काळामुळे अडचणीत सापडले. यंदा करोनाच्या संकटामुळे रब्बी हंगाम हातात आला खरा, परंतु टाळेबंदीत कवडीमोल भावाने कांदा, मका, भाजीपाला विकण्याची वेळ आली. वारंवार येणाऱ्या संकटामुळे शेतकरी बेजार होऊन कर्जबाजारी झाला. मान्सून वेळेवर दाखल झाल्यामुळे यंदा खरीपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. डोक्यावर कर्जाचा बोजा असतांना बहुतांश शेतकऱ्यांनी खरीपसाठी खासगी कर्जे घेतले. खरीपाचा पेरा केला आहे. मात्र अंकुर फूटत असतांना महावितरणच्या कारभाराचा फटका बसत आहे. दीड ते दोन महिन्यांपासून जळालेले रोहित्र बदलून मिळत नाही. यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे,  महावितरणच्या उदासिन यंत्रणेमुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाल्याची तक्रार आ. दिलीप बोरसे यांनी केली. जळालेले रोहित्र २४ तासात बदलून देणे बंधनकारक आहे. मात्र वीज कंपनी नियमांचे पालन करत नाही. देयके भरमसाठ दिली जातात. जळीत रोहित्रांच्या प्रश्नावर शासनाकडे दाद मागितली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

७० रोहित्र नादुरुस्त

महावितरण कंपनीच्या सटाणा विभागात तब्बल ७० रोहित्र दीड ते दोन महिन्यांपासून जळाली आहेत. नामपूर उपविभागात जळालेल्या रोहित्रांची संख्या सर्वाधिक आहे. नामपूर उपविभागात विविध क्षमतेचे एकूण ३९ रोहित्र नादुरुस्त आहेत. सटाणा उपविभागात त्यांची संख्या ३१ आहे. इंधन शिल्लक नसल्याचे कारणे दाखवून तब्बल दोन महिने रोहित्र बसविले जात नाही. त्यामुळे शेकडो कृषिपंप विजेअभावी बंद आहेत. पिकांना पाणी न मिळाल्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत.

आठ दिवसांत दुरुस्ती होणार

टाळेबंदीमुळे मजुरांचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे एवढय़ा प्रमाणात रोहित्र दुरुस्तीअभावी पडून राहिली आहेत. काही दिवसांपूर्वी ऑईलचा तुटवडा होता. आता मजूर काही प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे पुढील आठ दिवसात सर्वच रोहित्र बदलून दिली जातील, असे महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.