येवला विधानसभा मतदार संघातील महावितरणशी संबंधित सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना आ. छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.

महावितरण पायाभूत सुविधाअंतर्गत नवीन ३३ केव्ही उपकेंद्रांची क्षमता वाढविणे, उच्चदाब व लघुदाब वाहिनी यासह इतर प्रलंबित विषयांबाबत भुजबळ फार्म येथे भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

महावितरण पायाभूत सुविधाअंतर्गत विखरणी येथील ३३ केव्ही नवीन उपकेंद्राचे किरकोळ अपूर्ण काम तसेच कोटमगाव उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करावे, कानळद उपकेंद्राच्या जागेचा विषय सोडवून काम तत्काळ सुरू करण्याची सूचना भुजबळ यांनी केली. नगरसूल, नांदुर मध्यमेश्वर येथील उपकेंद्रांची क्षमता वाढविण्याचे काम पूर्ण झाले असून मुखेड येथील अपूर्ण असलेली तांत्रिक कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन श्रीनिवास इलेक्ट्रिकल कंपनीचे व्यवस्थापक पी. एन. नेहे यांनी यावेळी दिले. येवला शहरात २०२ पैकी केवळ ४४ रोहित्र तर येवला ग्रामीणमध्ये १७५ पैकी ५५ रोहित्रे, लासलगावमध्ये १६० पैकी ३७ रोहित्रे देण्यात आल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. पायाभूत सुविधांमधील रेंगाळलेल्या कामांबाबत यावेळी भुजबळांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून येवला मतदार संघातील ३४२ रोहित्रांपैकी किमान १२५ रोहित्र दोन दिवसात वितरित करावी आणि उर्वरित रोहित्र मार्चच्या आत पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले. कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी येवला येथे पुन्हा बैठक घेण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले. यावेळी दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या आयपीडीएसमधील प्रस्तावित कामांबाबतही चर्चा करण्यात आली. साबरवाडी उपकेंद्र आणि पाटोदा येथे १३२/३३ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र मंजूर झाल्याने ही कामे सुरू करण्याचे निर्देशही भुजबळ यांनी दिले. अनकाई, अंगुलगाव, भरवस येथे पाच एमव्हीए नवीन उपकेंद्र तर अंदरसूल, विंचूर येथे १३२/३३ केव्ही अतिउच्चदाब केंद्र प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीप्रसंगी मनमाड विभागाचे कार्यकारी अभियंता आर. डी. बडोले, चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एम. चव्हाण हेही उपस्थित होते.