डॉ. जब्बार पटेल यांचे मत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्याचे माध्यमांतर ही निरंतर प्रकिया असून, चांगले गुरू व सहकाऱ्यांचे सान्निध्य लाभल्यास आव्हाने स्वीकारून माध्यमांतरांची जातकुळी बदलता येते, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी मांडले. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दाखलेही दिले.
येथील लोकनेते व्यंकटराव मोरे महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित ‘साहित्याचे माध्यमांतर’ या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नाशिक ही अशा माध्यमांतराची भूमी असल्याचेही डॉ. पटेल यांनी नमूद केले. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या भूमीतून अनेक चित्रकृती निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी ‘सामना’ ते ‘एक होता विदूषक’ हा आपला प्रवास विविध उदाहरणांच्या माध्यमातून मांडला. सर्जनशीलता, प्रयोगशीलता ही कलाकृतीची शक्तिस्थाने असून माध्यमांतर ही सतत होत राहणारी प्रक्रिया असून, सध्याच्या माहिती तंत्रज्ञानामुळे या संदर्भातील खजिना तरुण पिढीला उपलब्ध झाला आहे. या ज्ञानाचा लाभ तरुणांना उपलब्ध करून देण्याचे व्यासपीठ म्हणून महाविद्यालयांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे महासचिव प्रशांत हिरे यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या विषयावर संशोधन व्हावे, अशी आशा व्यक्त केली. विनायकदादा पाटील यांनी महाराष्ट्रातील माध्यमांतरांचा साक्षीदार म्हणून ‘घाशीराम कोतवाल’, ‘बनगरवाडी’ पासून तर ‘टपाल’पर्यंत प्रत्येक साहित्यकृतीतून निर्माण झालेल्या चित्रपटांची, नाटकांची, कवितांची तपशीलपूर्वक मांडणी केली. साहित्यकृती व चित्रपट, नाटक अशा माध्यमांतर प्रक्रियेत होतकरूंनी योगदान देण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कवी प्रकाश होळकर यांनी, अस्वस्थ करणारे साहित्य महत्वाचे असून त्याचेच मुख्यत्वे माध्यमांतर झाल्याचे दाखले दिले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in literature is need for development
First published on: 10-10-2015 at 07:25 IST