शासकीय, पालिकेच्या प्रयोगशाळेत १० हजार नमुने तपासणी होणार

नाशिक : सकारात्मक अहवालांवरून मध्यंतरी जिल्हा प्रशासन आणि खासगी प्रयोगशाळेत झालेले वाद तांत्रिक समितीच्या अहवालानंतर अखेरीस संपुष्टात आले. सध्या शहर, ग्रामीण भागातील दररोज साडेतीन ते चार हजार नमुने तपासले जातात. महापालिका, शासकीय प्रयोगशाळेत नि:शुल्क चाचणी होते. खासगी प्रयोगशाळेत प्रति चाचणी ६०० ते हजार रुपयांपर्यंत दर मोजावे लागतात. दैनंदिन चाचण्यांपैकी सध्या ४५ टक्के चाचण्या शासकीय तर ५५ टक्के चाचण्या खासगी प्रयोगशाळेत होतात.

महापालिकेच्या बिटको आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळांची क्षमता १० हजारापर्यंत वृद्धिंगत झाल्यानंतर खासगी प्रयोगशाळेत तपासणी करणारे नागरिक शासकीय, पालिकेच्या प्रयोगशाळेकडे वळतील, असा आरोग्य यंत्रणेला विश्वास आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग वेगाने पसरत असल्याने तितक्याच जलदपणे बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी होणे क्रमप्राप्त ठरले आहे. खासगी प्रयोगशाळांच्या कार्यपद्धतीची अनुभूती प्रशासन, आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. अलीकडेच एका प्रयोगशाळेने अवघ्या १४ मिनिटांत अहवाल देण्याची करामत केल्याचे उघड झाले होते. शासकीय, महापालिका रुग्णालयात चाचणी केल्यावर अहवाल प्राप्त होण्यास विलंब होतो. शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेची दैनंदिन ८०० नमुने तपासणीची क्षमता आहे. उर्वरित नमुने परजिल्ह्यातील दोन शासकीय प्रयोगशाळांमध्ये पाठविले जातात. तिथे अन्य भागातील नमुने तपासणीचा भार असल्याने नमुने प्राप्त होण्यास वेळ लागतो. ही बाब नागरिकांना खासगी प्रयोगशाळांमध्ये नेण्यास कारक ठरत आहे. स्थानिक पातळीवर करोनाचे जलद निदान करण्यासाठी महापालिका आणि आरोग्य विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.

जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करून चाचणीची क्षमता पाच हजारहून अधिकवर नेण्यात येणार आहे. ही व्यवस्था कार्यान्वित करण्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्णत्वास जाईल. जोडीला महापालिका बिटको रुग्णालयात स्वत:ची प्रयोगशाळा स्थापन करीत आहे. २५ मार्चच्या आधी दैनंदिन पाच हजार नमुने तपासण्याची क्षमता असणारी ही प्रयोगशाळा कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून दिवसाला १० हजार नमुन्यांची तपासणी करता येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. या प्रयोगशाळांची क्षमता वाढल्यामुळे संपर्कातील व्यक्तींचा शोध आणि नमुने घेऊन तपासणीचे काम सोपे होईल.

शहर आणि जिल्ह्यात सध्या साडेतीन ते चार हजार जणांचे नमुने तपासणीला पाठविले जातात. यातील ४५ टक्के नमुने शासकीय प्रयोगशाळेत तर उर्वरित ५५ टक्के नमुने खासगी प्रयोगशाळांमध्ये जातात. आरोग्य विभाग आणि महापालिकेची प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्यानंतर शासकीय प्रयोगशाळांमध्ये नमुने तपासणीत वाढ होईल. – डॉ. अनंत पवार (समन्वय अधिकारी, जिल्हा रुग्णालय)