विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची माहिती 

नाशिक : पंतप्रधान काळजी निधीतून नाशिक येथे प्राणवायू निर्मितीचे चार प्रकल्प उभारले जाणार असून उद्योगांकडून अतिरिक्त दोन टँकर प्राणवायू दर आठवडय़ाला उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे सांगितले. करोनाच्या संकटात राज्य सरकारमधील बलशाली नेते आपल्या भागात अधिकाधिक रेमडेसिविर आणि प्राणवायू खेचून नेत आहेत. नाशिक शहर आणि ग्रामीण भागात सकारात्मकतेचा दर ३० टक्क्यांहून अधिक असतांना पुरवठा अतिशय कमी आहे. राज्य सरकारने प्राणवायू, रेमडेसिविरचे तर्कशुध्द वाटप आणि पुरवठा करण्याची गरज असल्याचेही फडणवीस म्हणाले.  सध्या द्रवरूप प्राणवायूची कमतरता असल्याचे समजल्यानंतर रिलायन्स आणि जिंदाल कंपनीकडून प्रत्येकी एक म्हणजे दोन अतिरिक्त टँकरची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.

फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी येथील जिल्हा शासकीय, महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन, बिटको या रुग्णालयांना भेटी दिल्या. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी चर्चा केली. यावेळी माजीमंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यावेळी महसूल आयुक्त वगळता माहिती देण्यासाठी प्रशासनातील कुणीही अधिकारी उपस्थित नव्हते. याचवेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी करोनाची स्थिती आणि लसीकरण मोहीम याविषयी तातडीने आढावा बैठक बोलावली होती. यावरून फडणवीस यांनी आपल्या दौऱ्याची पालकमंत्र्यांना कल्पना नसावी, त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असावी. सर्वसाधारणपणे असे होत नाही. पण ते नाशिकला झाले, असा चिमटा त्यांनी भुजबळ यांना काढला.

धुळे, नंदुरबार, जळगावच्या तुलनेत नाशिक, नगर जिल्ह्यात सकारात्मतेचा दर अधिक आहे. गंभीर परिस्थिती असूनही नाशिकला रेमडेसिविर, प्राणवायूचा कमी पुरवठा होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुळात महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा अधिक साठा मिळालेला आहे.मंत्र्याने आपापल्या जिल्ह्यासाठी प्रयत्न करणे स्वाभाविक आहे.रुग्णांची संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने त्यांचे वाटप आणि वितरणात एकसूत्रता आणण्याची आवश्यकता आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

रुग्णांकडून तक्रारींची जंत्री

नाशिकरोडच्या नवीन बिटको रुग्णालयाच्या पाहणीवेळी रुग्णांनी भाजप नेत्यांना आवाज देऊन वरच्या मजल्यावरील कक्षाजवळ बोलावले. रुग्णालयातील समस्यांची जंत्री मांडली. रुग्णालयाची स्वच्छता, भोजन, औषधे आदींबाबतच्या समस्या कथन केल्या. महापालिकेने स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाऱ्यांची भरती करावी, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली.