नाशिक शहर व ग्रामीण प्रयोगशाळेच्या उद्घाटनात गिरीश महाजन यांची अपेक्षा
तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने बदल होत असल्याने गुन्ह्य़ांचे स्वरूपही विलक्षण बदलत आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून घडणाऱ्या गुन्ह्य़ांना अटकाव घालण्यासाठी शहर व ग्रामीण पोलीस दलात अस्तित्वात आलेली सायबर प्रयोगशाळा महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल. सायबर गुन्ह्य़ांचा वेगाने तपास करण्यासाठी या प्रयोगशाळेतून आवश्यक ती माहिती तत्परतेने मिळविता येईल. नाशिक ग्रामीण पोलीस दल आणि शहर पोलीस आयुक्तालयात या प्रयोगशाळेचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनीदेखील संगणक आणि मोबाइलच्या माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्य़ांना आळा घालण्यासाठी ‘सायबर लॅब’ उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
राज्यात ४२ ठिकाणी एकाच वेळी या प्रयोगशाळांचे उद्घाटन झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आला असून, अशा स्वरूपाची यंत्रणा स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या यंत्रणेमुळे सायबर गुन्ह्य़ांचा तपास वेगाने होऊन गुन्हेगारांना वचक बसविता येईल. संवाद यंत्रणा वेगवान होत असताना त्यासोबत येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी ही अत्याधुनिक यंत्रणा उपयुक्त ठरेल. पोलीस मोबाइल व्हॅनमुळे नागरिकांना संकटकाळी तात्काळ मदत करता येईल आणि नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होईल, असे महाजन यांनी नमूद केले. विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग मोठय़ा प्रमाणात मोबाइल बँकिंग, ई-बँकिंग, ई-खरेदी, ई-गव्हर्नन्स आदी क्षेत्रांत होत आहे. समाज माध्यमांचा विस्तारही वाढत आहे. तंत्रज्ञानाच्या क्रांतीत दुसरीकडे या क्षेत्रात फिशिंग, क्लोनिंग, हॅकिंगसारखे प्रकारही वाढत आहेत. सायबर लॅबच्या माध्यमातून अशी गुन्हेगारी रोखणे किंवा गुन्ह्य़ांचा तपास तात्काळ करणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी आठ उपपोलीस अधीक्षकांच्या क्षेत्रात प्रत्येकी एक मोबाइल व्हॅन फिरती ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. या व्हॅनमध्ये सहा कर्मचारी आणि सुसज्ज साहित्य असणार आहे. भविष्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस यंत्रणेचाही उपयोग करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात पोलिसांना मदत करणारे ज्ञानेश्वर लहाने, प्रकाश कुटे, गोरक्ष शिंदे यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांनी सायबर प्रयोगशाळेची माहिती दिली.
या प्रयोगशाळेत पाच सामग्रीच्या सहायाने मोबाइल आणि विविध संगणकीय गुन्ह्य़ांची माहिती प्राप्त करणे सोईचे होणार आहे. कार्यक्रमास आमदार बाळासाहेब सानप, आ. देवयानी फरांदे व सीमा हिरे, महापौर अशोक मुर्तडक, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राधाकृष्णन एस., पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे आदी उपस्थित होते.

पोलीस विश्रामगृहाचे उद्घाटन
नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयात महाजन यांच्या हस्ते पोलीस विश्रामगृहाचे उद्घाटन करण्यात आले. नव्या सुविधांमुळे पोलीस दल अधिक सक्षम होईल. लॅबसाठी आमदार अपूर्व हिरे यांनी ३० संगणक आणि एक सव्‍‌र्हर उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्तालयात सायबर प्रयोगशाळेचे उद्घाटन कार्यक्रमात सहायक पोलीस निरीक्षक श्वेता शिंदे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. या लॅबमध्ये एकूण चार अधिकारी आणि आठ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. या कक्षाची सुविधा २४ तास उपलब्ध राहील. शहरातील विविध पोलीस ठाण्यांशी लॅब जोडली जाणार आहे. मोबाइल, संगणक, लॅपटॉप आदींवरील माहिती प्राप्त करणे या लॅबच्या माध्यमातून शक्य होणार आहे. सायबर गुन्ह्य़ांच्या विश्लेषणासाठी हार्ड डिस्कवरील माहिती आता मुंबईऐवजी नाशिक पोलीस आयुक्तालयातच मिळविता येईल.