पास जमा करून प्रवासी भाडे मागितल्याचा प्रकार

विद्यार्थिनींच्या प्रवासी  पासाची मुदत संपल्याने मनमाड आगाराच्या वाहकाने नांदगाव शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचे पास जमा करून त्यांच्याकडे बस भाडे मागितल्याने संतप्त विद्यार्थिनींनी नांदगाव बस स्थानकावर आंदोलन करून वाहतूक रोखून धरली. या अनपेक्षित प्रकाराने हडबडून जाऊन आगार व्यवस्थापनाने त्वरेने मोफत पास वाटप उपलब्ध करणे भाग पडले. त्यानंतर काही मिनिटात हे आंदोलन विद्यार्थिनीकडून मागे घेण्यात आले.

ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेद्वारे विद्यार्थिनींना बसचे मोफत पास उपलब्ध करून दिले आहेत. नांदगाव आगारानेही या योजनेचे मोफत पास ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना वाटप केले. वाटप केलेल्या पासची मुदत १५ सप्टेंबर रोजी संपली.

नवीन पास उपलब्ध नसल्याने नांदगाव आगाराने त्यांच्या सर्व वाहकांना आणि चालकांना विद्यार्थिनींना बसव्दारे प्रवास करू देण्याची सूचना दिली होती. नांदगाव आगाराजवळील मनमाड, चाळीसगाव, वैजापूर आदी आगाराच्या वाहक, चालकांना ही सूचना माहीत नसल्याने त्यांच्याकडून विद्यार्थिनींकडे पासची मुदत संपल्याने बस भाडय़ाची मागणी करण्यात येत असे. पैसे नसल्यास पास जमा करून घेत असत.

गुरुवारी सकाळी मनमाड आगाराच्या बसमध्ये विद्यार्थिनींचे पास वाहकाने स्वत:कडे जमा करून घेतल्याने पिंप्राळे, हिंगणवाडी परिसरातील २५ ते ३० विद्यार्थिनींनी नांदगाव बस स्थानकावर आंदोलन करून बसगाडय़ा रोखून धरल्या. आंदोलनाची माहिती मिळाल्याने न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक डी. व्ही. गोटे बस स्थानकात उपस्थित झाले. त्यांनी आगार व्यवस्थापनाशी संपर्क साधल्यावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना तेथेच जुने मुदत संपलेले पास जमा करून नवीन पास देण्यात आले.