‘निसाका’साठी आंदोलनाचा मेधा पाटकर यांचा इशारा

केंद्र सरकारचा साखर विकास निधी वापरून राज्यातील बंद पडलेले साखर कारखाने सुरू करता येतील. गरज पडल्यास सरकारने कारखाना चालविण्यासाठी शेतकऱ्यांशी भागीदारी करावी, असा उपाय ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी सुचविला आहे. अनेक महिन्यांपासून बंद असलेला निफाड साखर कारखाना सुरू करण्यासाठी राज्य शासनाला जाब विचारण्यासह पदयात्रा काढत जनआंदोलन उभे करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

निफाड येथे निसाका बचाव कृती समितीच्या वतीने बंद पडलेला निफाड साखर कारखाना सुरू करण्यासाठी मेधा पाटकर यांनी पुढाकार घ्यावा, असे साकडे घालण्यात आले. मंगळवारी कारखाना आवार परिसरात पाटकर यांनी शेतकरी आणि कारखान्याचे सभासद यांना मार्गदर्शन केले. या वेळी पाटकर यांनी सहकार क्षेत्राची काही वर्षांपासून जाणीवपूर्वक वाट लावण्यात येत असल्याचा आरोप केला. राजकीय षडयंत्रातून सहकारी तत्त्वावर सुरू असलेले कारखाने बंद करण्यात येत असून, दुसरीकडे ४० सहकारी कारखान्यांची मालकी खासगी झाल्यावर ते नियमितपणे कसे सुरू राहतात, हे कसे होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याआधी २७.५५ कोटींसाठी नाशिक जिल्ह्य़ातीलच गिरणा साखर कारखाना गिळंकृत केला गेला. हे करणारे सुदैवाने आज कारागृहात आहेत, असा टोला पाटकर यांनी छगन भुजबळ व समीर भुजबळ यांचे नाव न घेता लगावला. सहकाराला राजकारणाचा पडलेला विळखा मोडून काढण्याची वेळ आली आहे. समतेचे, न्यायाचे राज्य यावे यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत. या पाश्र्वभूमीवर निसाकाचा इतिहास लेखापरीक्षणाच्या कागदपत्रांसह तपासण्याचा आमचा निर्धार असून जिल्ह्य़ातीलच बंद पडलेला वसंतदादा सहकारी साखर कारखाना पुन्हा सहकारी तत्त्वावर सुरू  होऊ शकतो, तर निसाका का नाही, असा प्रश्नही पाटकर यांनी उपस्थित केला. सर्व राजकीय पक्ष निफाड कारखान्यावर ताबा मिळविण्यासाठी टपून बसले आहेत. तसे आम्ही होऊ देणार नाही. केंद्राचा साखर विकास निधी वापरण्यात मोठा घोटाळा होत आहे. तोच पैसा वापरून कारखाना वाचविण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतो. यासाठी वरिष्ठ पातळींवर चर्चा करण्यात येईल. एकीकडे ‘मेक इन इंडिया’ची चर्चा होत असताना शेती कारखानदारीपूरक करण्यासाठी सरकारदरबारी काय प्रयत्न होत आहेत? मेक इन इंडिया हे इंडियाचेच असले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे पाटकर यांनी स्पष्ट केले.

निफाड साखर कारखाना सुरू होण्यासाठी गिरणा साखर कारखान्यापासून निफाड कारखाना आणि निफाड कारखान्यापासून मुंबई अशी पदयात्रा काढून जनरेटा उभारण्यात येईल. सरकारला याचा जाब विचारला जाईल. यावर तोडगा नक्की निघेल. गरज पडल्यास मंत्रालयावर धडक दिली जाईल, पण कारखाना सुरू केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या वेळी सर्वाच्या उपस्थितीत कारखाना अवसायनात काढणे मंजूर नसल्याचा ठराव करण्यात आला.