लोकप्रतिनिधींची अनास्था; निधीची कमतरता
कविवर्य नारायण सुर्वे यांनी आपल्या लेखणीतून अस्वस्थ मनाची स्पंदने टिपत असताना वंचिताच्या प्रश्नांचा वाचा फोडण्याचा नेहमीच प्रयत्न केला. त्यांच्या अमूल्य अशा साहित्य संपदेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयास सध्या महापालिकेच्या लालफितीच्या कारभारासह लोकप्रतिनिधींची अनास्था, निधीची कमतरता अशा विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी वाचनालयाच्या ‘माझे विद्यापीठ’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रवास अधिकच खडतर झाला असून समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वाचनालयाने केले आहे.
कामगारबहुल सिडको वसाहतीमधील मायको फोरमने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांची आखणी केली. या उपक्रमांशी कविवर्य सुर्वे यांची ही नाळ जुळली. याच कालावधीत फोरमने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचनालय सुरू करण्याचे ठरवले. या वाचनालयासाठी फोरमने स्वत:च्या सिंहस्थनगर येथील वास्तूचा आधार घेत कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावे १९९८ मध्ये वाचनालय सुरू केले. वाचनालयाच्या उद्घाटनानंतर वाचनालय आणि फोरमशी असलेले त्यांचे नाते अधिकच दृढ झाले. वाचनालयाचा प्रतिसाद पाहता त्यांनी आपली सर्व साहित्य संपदा वाचनालयास देण्याचे ठरवले. त्याच वेळी शहर परिसरातील पुरोगामी मंडळींनी सुर्वे यांना मिळालेले पुरस्कार वाचनालयास देण्याची विनंती केली. पुरस्कारांचा सर्व अमूल्य ठेवा नाशिककरांना २००७ मध्ये कला दालनच्या माध्यमातून खुला झाला. या सर्व घडामोडीत सुर्वे काही काळ नाशिकमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या वास्तव्याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी सुर्वे यांना महापालिकेच्या वतीने घर देण्याची घोषणा करण्यात आली. पालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूदही झाली. मात्र सुर्वे यांनी या सर्वापासून दूर राहणे पसंत करत आपल्या मूळ गावी ठाणे परिसरात मुक्काम ठोकला.
दरम्यानच्या काळात वाचनालयाने पालिकेने २००५ मध्ये मंजूर केलेल्या मोकळ्या भूखंडासाठी पाठपुरावा करीत सुर्वे यांच्या नावे सुरू असलेल्या वाचनालयाचे ‘माझे विद्यापीठ’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात रूपांतर करण्यासाठी प्रारूप आराखडा तयार केला. त्यात महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम, वाचनालय, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, वर्तमानपत्राचे दालन, खुले सभागृह आदींचा समावेश आहे. यासाठी तीन मजली इमारतीचे प्रारूप दाखविण्यात आले. मात्र पालिकेने खुटवडनगर परिसरात प्रत्यक्ष मंजूर केलेली जागा वाचनालयाला टप्प्याटप्प्याने २०१२ मध्ये पूर्ण स्वरूपात मिळाली. त्या ठिकाणी अद्यापही काही अंशी अतिक्रमणे आहेत. वाचनालयाने दिलेल्या आराखडय़ातील केवळ १२८६ चौरस मीटर क्षेत्रास मान्यता दिली असून हे सर्व बांधकाम एकाच मजल्यापुरते मर्यादित असावे, असा र्निबध घालण्यात आला.

पालिकेने अद्याप बांधकामास परवानगी न दिल्याने केवळ या वास्तुत सुर्वे यांच्या नावे वाचनालय, वर्तमान पत्राचे मुक्त दालन सुरू आहे. लोकप्रतिनिधी केवळ प्रसिद्धीची हौस भागविण्यापुरता वाचनालयाचा वापर करून घेत असल्याचा वाचनालयाच्या कार्यकारिणीचा अनुभव आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पास अंदाजे दीड कोटीच्या निधीची गरज आहे. महापालिका मंजुरी देत नाही म्हणून लोकप्रतिनिधींच्या निधीतून या ठिकाणी काम करता येत नाही. फोरमच्या पाठपुराव्याला पालिका दाद देत नसल्याने निधी जमवाजमव ते मंजुरी हा सर्व प्रवास खडतर होऊन गेल्याची भावना वाचनालयाचे संस्थापक राजू नाईक यांनी व्यक्त केली.