विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात निदर्शने करण्यात आली. यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांची भेट घेतली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने लक्ष घालून सोडवावेत, अन्यथा पक्षाच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

यावेळी विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू, जनसंपर्क अधिकारी, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. पावसाअभावी राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. या स्थितीत शेतकरी व कष्टकरी जनतेच्या मुलांना शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूरांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता संबंधितांना सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क, वसतिगृह शुल्क, बस पास शुल्क पूर्णपणे माफ करण्याची मागणी कोते पाटील यांनी केली. तसेच विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या आणि हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी प्रस्तावित असलेली ‘नीट’ परीक्षा खासगी महाविद्यालयांस देखील स्थगित करण्यात यावी. परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत निकाल लागावा असे संकेत असतांना विद्यापीठात तीन-चार महिन्यांपर्यंत वाट पहावी लागते. निकाल वेळेत लागावे, वैद्यकीय महाविद्यालयांच्या परीक्षांसाठी पुनर्मुल्यांकन सुरू करावे, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील शुल्क माफ करावे, पदव्युतर परीक्षांसाठी असलेली शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरू करावी, आंतरवासीय प्रशिक्षण बदलीसाठी विद्यार्थ्यांवर पडणारा पाच हजार रुपयांचा इतका बोजा कमी करावा, आयुर्वेदीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांना वैद्यकीय विम्यासाठी मान्यता द्यावी, होमिओपॅथिक व आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी स्वतंत्र एमसीआयएम नोंदणी क्रमांक द्यावा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्वच्छतागृह तसेच आवश्यक त्या दैनंदिन सुविधा मिळाव्यात, वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज तासिकांप्रमाणे करावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, प्रदेश चिटणीस अर्जुन टिळे, विष्णुपंत म्हैसधुणे, सचिन पिंगळे, छबु नागरे आदी उपस्थित होते.