News Flash

वाइन प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात

प्रकल्पाविरोधात आंदोलनाची तयारी

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

प्रकल्पाविरोधात आंदोलनाची तयारी

जऊळके वणी येथील सहकारी तत्त्वावर उभा केलेला शॅम्पेन वाइन प्रकल्प राज्य बँकेने परस्पर खासगी कंपनीला विकून आधीच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असतांना आता ज्या कंपनीने खरेदी केला, त्या प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा बँकेचे संचालक गणपत पाटील यांनी दिला आहे.

जऊळके वणी येथील शॅम्पेन प्रकल्पात दिंडोरी, निफाड, नाशिक आणि चांदवड तालुक्यातील सुमारे साडेचार हजार द्राक्ष उत्पादक सभासद झाले होते. एक कोटी चार लाख रुपयांचे भाग जमा करण्यात आले होते. राज्य बँकेकडून कर्ज आणि शासनाची काही रक्कम याप्रमाणे पाच कोटी रुपये खर्चून या प्रकल्पाची उभारणी झाली होती. परंतु काही तांत्रिक अडचणी आणि विक्रीअभावी प्रकल्प बंद पडला. राज्य बँकेने प्रकल्पाला दिलेले कर्ज थकल्याने हा प्रकल्प परस्पर विकण्यात आला.

सध्याच्या जमीन मालकाने खरेदीला अनेक अडचणी येत असतानाही प्रकल्प  केवळ पाच कोटी ११ लाखाला विकत घेतल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. त्यामध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी मोफत दिलेली कोटय़वधींची जमीन साडेचार हजार सभासदांच्या भाग रकमेचा कोणताही विचार केला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांवर अन्याय केला. कोणताही विचार न करता मालकाने प्रकल्प, जमीन खरेदी करून घेतली. या प्रकल्पात सध्या द्राक्षापासून वाइन निर्मितीचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे आपल्या द्राक्षांची विक्री होईल, द्राक्षास योग्य मोबदला मिळेल अशीही शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली. त्यात स्थानिकांना प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. २४ तास परिसरात दरुगधी असते. दूषित पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे प्रकल्पालगतच्या एक ते दीड हजार ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना डेंग्यूसदृश आजारासह अन्य व्याधी जडत आहे. नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही संबंधित कंपनी थातूर-मातूर उत्तरे देऊन वेळ निभावून नेत असल्याची तक्रार पाटील यांनी केली. परिसरातील ग्रामस्थांनी प्रकल्प व्यवस्थापनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या. परंतु दोन-चार दिवसात बंदोबस्त केला जाईल, असे सांगून प्रत्यक्षात कोणतीच कार्यवाही केली जात नाही. परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी कंपनीकडे आणि पोलीस ठाण्यातही अर्ज दिले. मात्र कंपनीकडून वेळकाढू धोरण अवलंबले गेले. जऊळके वणी येथील दुर्गंधीयुक्त वायनरी प्रकल्प हलवला न गेल्यास परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ टोकाचा मार्ग अवलंबतील आणि होणाऱ्या परिणामांची जबाबदारी कंपनी मालक, पोलीस ठाणे, स्थानिक अधिकारी यांच्यावर राहील, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री, प्रदूषण विभाग यांच्याकडे तक्रार केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या संदर्भात कंपनीच्या प्रतिनिधीशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही ते उपलब्ध झाले नाहीत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 1:12 am

Web Title: pollution due to wine project
Next Stories
1 सुरगाणामध्ये रावणाच्या मुखवटय़ाची मिरवणूक
2 मी टू मोहीम एक वैचारिक मंथन
3 ‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमास सुरुवात
Just Now!
X