विशेष अधिवेशनासाठी पाठपुराव्याचे साकडे

नाशिक : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी, त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर आंदोलनास बुधवारी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी नाशिक पश्चिमच्या सीमा हिरे, नाशिक पूर्वचे राहुल ढिकले यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या देण्यात आला. नाशिक पश्चिमच्या आमदार देवयानी फरांदे यांनाही निवेदन देण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आहे. भविष्यात मराठा आरक्षणाची परिस्थिती बघता याची जबाबदारी सर्व आमदार, खासदारांनी घेणे महत्त्वाचे आहे. मराठा आरक्षणप्रश्नी लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष यांना विशेष अधिवेशन आणि आरक्षणप्रश्नी पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी पत्र द्यावे, अशी मागणी करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. काही आमदार, खासदार वगळता जास्त कोणी या मुद्यावर सभागृहात आवाज उठविलेला नाही, असा आक्षेप क्रांती मोर्चाने घेतला आहे. आपण ज्या मतदार संघातून निवडून येतात, मग तो खुला असो वा राखीव मतदारसंघ मराठा समाज कुठलाही भेदभाव न करता निवडून देत सभागृहात पाठवितात. परंतु, निवडणूक झाल्यानंतर पक्षाची बांधिलकी जपत आपण मराठा समाजाच्या न्यायिक मागण्यांसाठी आवाज उठविण्यात कुठे तरी कमी पडत असून याचे आत्मचिंतन करावे, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.

मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसंदर्भात दोन दिवसीय विशेष अधिवेशन घ्यावे आणि सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीविषयी पुनर्याचिका लवकरात लवकर दाखल करावी. न्यायालयाने चालू शैक्षणिक वर्ष २०२० आणि २१ मध्ये वैद्यकीय उच्च शिक्षण, इतर शैक्षणिक मराठा आरक्षण रद्द केले. यापूर्वी झालेले शैक्षणिक प्रवेश, नोकर भरती संदर्भातील आरक्षण जसे आहे तसे ठेवून वटहुकूम काढून मराठा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा,  त्यासाठी त्वरित आदेश काढून मराठा युवकांना न्याय द्यावा. त्यामुळे समाजातील विद्यार्थी शिक्षण, नोकरीपासून वंचित राहणार नाही, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी पुढील दोन दिवसात पक्षीय विचारसरणी बाजूला ठेवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे करण्याची मागणी करण्यात आली.  मराठा क्रांती मोर्चाची मागणी हिरे यांच्यासह ढिकले यांनीही मान्य केली. मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीसाठी आपण आधीपासून प्रयत्नरत आहोत. मराठा समाजातील युवकांच्या हिताचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून हिरे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या भूमिकेला पाठिंबा दिला.