News Flash

सलग दुसऱ्या दिवशीही बँकेत झुंबड

जुने चलन बदलून नवीन चलन घेण्यासाठी बँकामार्फत काऊंटरच्या संख्येत वाढ करण्यात आली.

प्रातिनिधिक छायाचित्र

 

पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्दबातल ठरल्यानंतर धास्तावलेल्या नागरिकांनी सलग दुसऱ्या दिवशीही सकाळपासून शहर व ग्रामीण भागात बँकांच्या शाखांबाहेर गर्दी कायम राहिली. खातेदारांकडून नोदा बदलण्याची मागणी लक्षणीय असल्याने दुपारी अनेक शाखांमध्ये खडखडाट झाल्याचे पहावयास मिळाले. यामुळे कित्येक तास रांगेत थांबूनही  अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. दुसरीकडे, नोटा बदलण्यासाठी आलेल्यांना काही बँकानी नकार दिल्यामुळे ग्राहक व बँक कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाले. शहर परिसरात चलन तुटवडा जाणवल्याने आर्थिक व्यवहार काहीसे मंदावलेले असतांना महापालिका, वीज कंपनींच्या तिजोरीत मोठी भर पडत असल्याचे पहावयास मिळाले.

चलनातून बाद झालेल्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी, जुन्या नोटांचा भरणा करण्यासाठी आणि बँकेतून पैसे काढण्यासाठी शहरातील सर्वच बँकामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सकाळपासून प्रचंड गर्दी उसळली. राष्ट्रीयकृत बँकामध्ये निवृत्ती वेतनधारक, ज्येष्ठ नागरिक आपली जमा पुंजीतील काही रक्कम मिळते का हे पाहण्यासाठी  तासन्ंतास तिष्ठत उभे राहिले. अनेकांचे रांगेतील क्रमांकावरून तसेच कामकाजाच्या वेळ, संथ पद्धतीने होणारे काम यासह अन्य काही कारणांवरून वाद झाले. तर सहकारी बँकांमधून ‘करन्सी चेस्ट’ मधून रोख रक्कम उपलब्ध न झाल्याने ग्राहकांना पैसे देण्यासाठी बँकाना अडचणी आल्या. जुने चलन बदलून नवीन चलन घेण्यासाठी बँकामार्फत काऊंटरच्या संख्येत वाढ करण्यात आली. मात्र काही दिवसानंतर पैसे मिळतील असे बँक व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी गर्दी कायम असली तरी चलन तुटवडय़अभावी ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहकारी बँकांच्यावतीने करण्यात आले. बँकांमध्ये नोटा बदलून घेण्याबरोबरच लॉकर उघडणाऱ्यांनी गर्दी केली. यामध्ये दागिने काढण्यापेक्षा लॉकरमधील  ५०० व १००० बंडले काढणाऱ्यांची संख्या अधिक राहिल्याचे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

या गदारोळात काहींच्या हाती दोन हजाराची नव्या नोटय़ा पडल्या असल्या तरी आर्थिक व्यवहारात दोन हजार रुपयांची नोट दिल्यानंतर समोरच्याकडे सुट्टे पैसे नसतील तर करायचे काय, यावरून अनेकांनी ती नोट परत करत १०० रुपये तर काहींनी १० रुपयांचे बंडल मागून घेतले. दरम्यान, रांगेत तिष्ठत असलेल्या नागरिकांना ऐनवेळी पैसे संपले हे ऐकत घरी परतावे लागले.

कान्हेरवाडी येथील वासंती देशमुख यांनी गुरूवारी सकाळी आठ वाजेपासून टपाल कार्यालयात केवळ ३०० रुपये काढण्यासाठी आल्या होत्या. पण काल क्रमांक न लागल्याने छोटय़ा चिमुकली सोबत तशीच घरी परतल्या. आज ११ वाजता क्रमांक येऊनही पैसे संपले असे सांगण्यात आले. घरी पैसे आहेत पण त्याचा उपयोग नाही. औषधे संपलीत, भाजीपाला खरेदी करायचा, गरजेच्या वस्तू आणायच्या कुठून असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला. नेमकी या उलट परिस्थिती नीलेश जाधव यांची होती.  दोन हजाराची कोरी नोट हातात पडली. त्या सोबत सेल्फीही काढून झाला. भ्रमणध्वनीचे ६५० रुपये बील भरण्यासाठी गेले असतांना समोरून ती रक्कम वजा करत उरलेली रक्कम ‘डिपॉझिट’ करण्यात आली. वास्तविक उरलेल्या पैशात पेट्रोल आणि वरखर्च भागवायचा होता, असे त्यांनी सांगितले.

शहर परिसरातील काही निवडक राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम शुक्रवारी सुरू झाले.  मात्र या ठिकाणाहून पैसे मिळतात असे कळल्यावर एकच गर्दी झाली. त्याही एटीएम केंद्रात चलन संपल्याने एटीएम केंद्र दुपारनंतर बंद झाले. दरम्यान, नाशिक महापालिकेच्या शहर परिसरातील वेगवेगळ्या विभागीय कार्यालयात नागरिकांनी मालमत्ता, पाणीपट्टी कर भरणा करण्यासाठी गर्दी होती. अशीच काहीशी परिस्थिती वीज वितरण महामंडळाच्या कार्यालयात बील भरणा करण्यासाठी राहिली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी गस्त वाढविली आहे.

महापालिका श्रीमंतहोण्याच्या मार्गावर

नाशिक महापालिकेने कर वसुली होण्याच्यादृष्टिने ५०० व १००० च्या नोटा स्विकारण्याचा निर्णय घेतल्याने पालिकेच्या नाशिक पूर्व, पश्चिम, सातपूर, सिडको, पंचवटी व नाशिकरोड विभागीय कार्यालयात व्यवस्था करण्यात आली. घरपट्टी, पाणी पट्टीची थकबाकी भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिकांची अडवणूक न करता कर्मचाऱ्यांनी सौजन्याचे धोरण स्विकारले. सर्वत्र आर्थिक व्यवहार थंडावलेले असतांना महापालिकेच्या तिजोरीत मात्र तासागणिक भर पडली.

वीज वितरण कंपनीचा आडमुठेपणा

वीज कंपनीने रद्दबातल नोटा स्विकारण्याचे धोरण ठेवले असले तरी कामात आडमुठेपणाचे धोरण मात्र ठेवले. वीज बिलाची थकीत रक्कम किंवा चालु देयके देण्यासाठी ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावलेल्या असतांना रद्द बातल नोटा स्विकारल्या. मात्र ऐनवेळी पॅनकार्ड, आधारकार्ड आदी कागदपत्रांची मागणी केली. यामुळे कर्मचारी आणि वीज ग्राहक यांच्यात वाद झाले. काहींना कागदपत्रांअभावी माघारी परतावे लागले.

बाजारपेठेत शुकशुकाट

किरकोळ खरेदीसाठी आवश्यक असे पैसे हाती नसल्यामुळे नेहमीच गजबजलेली नाशिकची मुख्य बजारात व्यवहार थंडावले आहेत. मेनरोड, रविवार कारंजा परिसरात पैशांअभावी आर्थिक व्यवहार मंदावले. परिणामी बाजारपेठेत शुकशुकाट असल्याचे पहावयास मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2016 12:30 am

Web Title: que in front of bank for changing old notes
Next Stories
1 वृक्षसंवर्धनासाठी कांद्याच्या गोण्यांचा आधार
2 पुलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विभाग
3 शासकीय यंत्रणेच्या अनास्थेने नंदुरबारमधील पोल्ट्री उद्योगाची वाताहत
Just Now!
X