उपचार घेणाऱ्या करोनाबाधितांची संख्या २२ हजाराच्या उंबरठय़ावर

नाशिक : विभागात करोनाचा आलेख उंचावत असून आतापर्यंत एक लाख १२ हजार ३०६ रुग्ण आढळून आले आहे. त्यातील ८७ हजार ९५९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.३२ टक्के इतके आहे. करोनामुळे आतापर्यंत २४९६ रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत २१ हजार ८५१ रुग्ण उपचार घेत आहेत. विभागातील करोनाच्या स्थितीची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. एम. आर. पटणशेट्टी यांनी दिली. विभागात आतापर्यंत तीन लाख ५९ हजार ५६३ जणांचे नमुने घेण्यात आले. त्यातील एक लाख १२ हजार ३०६ जणांचे अहवाल सकारात्मक आले. दोन लाख ४२ हजार ५४ जणांचे अहवाल नकारात्मक आले. ९६१ जणांचे अहवाल अनिर्णित आहेत. मागील २४ तासात विभागात ३२९९ रुग्ण आढळले. तर ४९ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. विभागात सध्याचा मृत्यूदर २.२२ टक्के आहे. विभागात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ४२ हजार ५१६ रुग्ण नाशिक जिल्ह्य़ात आढळले. त्यातील ३४ हजार १३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर ९२१ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या सात हजार ४६० रुग्ण उपचार घेत आहेत. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजार ६६२ रुग्ण आढळले. त्यातील २२ हजार ३६३ जण बरे झाले. ८६८ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या साडेआठ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाटय़ाने विस्तारली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २५ हजार १८५ रुग्ण आढळले असून यातील २१ हजार ७७० रुग्ण बरे होऊन घरी परतले. ३५० जणांचा मृत्यू झाला. सध्या तीन हजार ६५ रुग्ण उपचार घेत आहेत. धुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या दहा हजाराचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. ७६५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले तर २७७ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या १६८९ रुग्ण उपचार घेत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात ३३२० रुग्ण आढळले. यातील २०३४ रुग्ण बरे झाले तर ८० जणांचा मृत्यू झाला. सध्या १६८९ रुग्ण उपचार घेत आहेत. विभागात सध्या २६ हजार ८२४ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत. तर ५६९७ रुग्ण संस्थांत्मक विलगीकरणात आहेत.