नाशिक : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बुधवारी आयोजित ‘एकता दौड’मध्ये नाशिककरांनी मोठय़ा प्रमाणावर सहभाग घेतला. येथील पोलीस कवायत मैदानावर आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल आणि विशेष पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोरजे यांच्या हस्ते झेंडा दाखवून एकता दौडला सुरुवात करण्यात आली.

यावेळी डॉ. सिंगल यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्वानी एकत्रित प्रयत्न करावे, देशाला तसेच जगाला आपण एक असल्याचा संदेश द्यावा, असे आवाहन केले. यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. एकता दौडसाठी महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे, उपायुक्त रघुनाथ गावडे, सुखदेव बनकर, पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, विजयकुमार मगर आदी उपस्थित होते. यावेळी दौडच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, नो हॉर्न, महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. शाळकरी विद्यार्थ्यांसोबतच महिला, पुरुषांनी दौडमध्ये सहभाग घेतला. पोलीस कवायत मैदानापासून सुरू झालेली एकता दौड गंगापूर रोडमार्गे कॉलेजरोडवरून कॅनडा रोडमार्गे पोलीस कवायत मैदानावर आली. ‘मालेगाव मॅरेथॉन २०१९- पर्व दुसरे’ फलकाचे अनावरण

नाशिक ग्रामीण पोलीस आणि मालेगाव पोलीस दल यांच्या वतीने मालेगाव येथील पोलीस कवायत मैदानावर एकता दौड झाली. एकता दौडला अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. दौड एकात्मता चौक, फुले पुतळा, मोसम पूल, शिवाजी पुतळा, दत्तमंदिर, संगमेश्वर, गांधी पुतळामार्गे पोलीस कवायत मैदानावर थांबली. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सहा जानेवारी रोजी होणाऱ्या ‘मालेगाव मॅरेथॉन २०१९- पर्व दुसरे’ या फलकाचे अनावरण करण्यात आले.

एकता दौडमध्ये सहभागी नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्ह्य़ातील १५ पोलीस ठाणे परिसरात विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीने एकता दौड काढण्यात आली.