शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने ‘नाशिक २१ के’ धावण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून त्यात शहरवासीयांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असा प्रयत्न आहे. या स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर, रविवारी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. सकाळी पाच ते दुपारी बारा या कालावधीत त्र्यंबक रस्त्यावरील हॉटेल राजदूत ते हॉटेल संस्कृती या दरम्यानची एकेरी मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. ही वाहतूक उर्वरीत मार्गावरून दुहेरी स्वरुपात होईल.
ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन किलोमीटर, १७ वर्षांपुढील मुला-मुलींसाठी पाच किलोमीटर, १८ वर्ष वयोगटापुढील युवक-युवती दहा अथवा २१ किलोमीटर या अंतराची ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन तसेच महाविद्यालय व संस्थांसाठी ऑफलाईन नोंदणीची सुविधा करण्यात आली आहे. त्यास शहरवासीयांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून सहभागी होणाऱ्यांची संख्या बारा हजारहून अधिकवर पोहोचली आहे. जे स्पर्धक स्पर्धा पूर्ण करतील, त्यांना पदक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. धावण्याच्या स्पर्धेचा मार्ग नाशिक पोलीस आयुक्तालय संकेतस्थळावर देण्यात आला आहे. या स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून स्पर्धा मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्र्यंबक रस्त्यावरील हॉटेल राजदूत ते हॉटेल संस्कृती या दरम्यानची वाहतूक सकाळी पाच ते दुपारी बारा या कालावधीत बंद राहील. या मार्गावरून चालणारी वाहतूक एकेरी मार्गावरून दुहेरी चालणार आहे. म्हणजेच नाशिकला येणारी वाहतूक डाव्या बाजुने तर त्याच मार्गावरून उजव्या बाजुने त्र्यंबकला जाणारी वाहतूक चालेल. हे र्निबध पोलीस दलाची वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू राहणार नाहीत. या बाबतची माहिती पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी दिली आहे.