पंप लावून पाणी बाहेर काढण्याचे काम

तासाभरातील पावसाने पाणी, चिखल व कचऱ्याच्या दलदलीत सापडलेल्या सराफ बाजारासह इतर भागातील दुकाने व घरांच्या स्वच्छतेचे काम गुरूवारी युध्दपातळीवर हाती घेण्यात आले. पावसाने व्यापारी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले. पडलेली झाडे हटविण्याचे काम पूर्णत्वास नेण्यात आले. प्लास्टिक कचऱ्याने नाले व गटारींच्या वहन मार्गात अडथळे निर्माण केले. पुन्हा तेच संकट ओढावू नये म्हणून लगोलग हा कचरा हटवून नाले व गटारींचा मार्ग मोकळा करण्यास प्राधान्य देण्यात आले. व्यापारी संकुल, निवासी इमारती व तळघरातील १७ ठिकाणी साचलेले पाणी अग्निशमन विभागाने पंप लावून बाहेर काढले. तर वेगवेगळ्या १५ घटनांमध्ये झाडांच्या फांद्या हटवून अडथळे दूर करण्यात आले.

बुधवारी सायंकाळी दीड तासात शहर परिसरात ९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी मेनरोड, रविवार कारंजा आदी भागातून पाण्याचे लोंढे सराफ बाजारात धडकले. रस्त्यावर उभ्या दुचाकी पाण्याने वाहून नेल्या. सराफ बाजारातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. काही व्यापारी संकुलातील तळमजले पाण्याखाली बुडाले. शरणपूर व गंगापूर रोड, कॉलेज रोड, जिल्हा शासकीय रुग्णालय ते वेद मंदिर, सातपूर-अंबड लिंक रोड, मायको सर्कल व सिटी सेंटर मॉल चौक यासह मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर सर्वत्र पाण्याचे लोट वहात होते. गटारींवरील ढाप्यांमधून पाणी उसळून बाहेर पडले. काही रस्त्यांवर दुभाजकामुळे पाण्याचा निचरा होणे अवघड बनले. अनेक ठिकाणी झाड कोसळल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले. सराफ बाजारांसह अनेक ठिकाणी दुकाने व घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. या स्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा मध्यरात्रीपासून कार्यप्रवण झाल्याचे शहर अभियंता यु. बी. पवार आणि अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन यांनी सांगितले.

सराफ बाजारासह आसपासच्या भागातील दुकाने, रस्ते व व्यापारी संकुल पाण्यासोबत वाहून आलेला कचरा व गाळ्याच्या दलदलीत सापडला. गुरूवारी या भागातील दुकानांमधील व्यवहार बंद होते. व्यापाऱ्यांनी सकाळपासून स्वच्छतेचे काम हाती घेतले. नुकसानीचा अंदाज बांधला गेला. इमारतींचा तळमजला, व्यापारी संकुलात साचलेले पाणी उपसण्यासाठी पालिकेने अधिक क्षमतेच्या पंपाची व्यवस्था केली. रस्ता व दुकानांसमोरील घाण काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या बंबांनी पाण्याचा फवारे मारले. सराफ बाजारात पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी सरस्वती नाल्यासह अन्य काही नाले आहेत. त्यांची सफाई न झाल्यामुळे पाणी बाजारात शिरल्याची तक्रार व्यावसायिकांनी केली. तथापि, पाण्याचा निचरा न होण्यामागे पाण्यात वाहून आलेला प्लास्टिक कचरा कारणीभूत ठरल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. भुयारी नाल्यात प्लास्टिक व तत्सम कचरा अडकू नये म्हणून जाळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाच्या पाण्यात वाहून आलेल्या प्लास्टिक कचरा जाळीवर अडकला. यामुळे नाल्यात पाणी जाण्यास अडथळे निर्माण झाल्याचे पवार यांनी सांगितले. या पाश्र्वभूमीवर, नाल्यांवरील जाळीच्या सफाईचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले.

अग्निशमन दलाने चोवीस तासात ४२ घटनांमध्ये वेगवेगळ्या पध्दतीने मदतकार्य केले. पावसाने वेगवेगळ्या भागात झाडे अथवा त्यांच्या फांद्या कोसळण्याच्या १५ घटना घडल्या. पडलेली झाडे दूर करण्यात आल्या. तसेच जवळपास १७ ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. हे पाणी उपसण्याचे काम करण्यात आले. इतर १० तक्रारींवर आवश्यकतेनुसार कारवाई केली गेल्याचे महाजन यांनी सांगितले.