मंदीच्या झळीचा परिणाम; व्यवस्थापनाची कामगार संघटनांबरोबर चर्चा

नाशिक : औद्योगिक क्षेत्रातील मंदीची झळ मोठय़ा उद्योगांपाठोपाठ त्यावर अवलंबून असणाऱ्या लहान-मध्यम उद्योगांना बसत आहे. या संकटातून सावरण्यासाठी काही उद्योगांनी आपल्या कर्मचाऱ्यांना अन्य प्रकल्पांमध्ये स्थलांतरित करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी व्यवस्थापनाकडून कामगार संघटनांशी बोलणी करण्यास सुरुवात झाली आहे.

काम पूर्णपणे बंद असण्याच्या काळातील निम्मे दिवस कामगारांच्या सुट्टीत गृहीत धरावे, असा काही व्यवस्थापनाचा आग्रह आहे. मोठय़ा उद्योगांनी उत्पादन थांबविल्यास आपणासही काही काळ काम बंद करावे लागेल याचे संकेत देत या संकटातून बाहेर पडण्यासाठी कामगारांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सहकार्य करावे, यासाठी व्यवस्थापनाने कामगार संघटनांशी विचारविनिमय सुरू केला आहे.

नाशिकच्या औद्योगिक विश्वाची भिस्त मुख्यत्वे वाहन उद्योगावर असून यामध्ये महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, बॉश, रिंग गिअर, बजाज सन्स, एम. डी. इंडस्ट्रिज, सीएट टायर आदींचा समावेश आहे. या कारखान्यांमध्ये उत्पादनात कपात झाल्याची झळ मध्यम, लघू उद्योगांना बसत आहे. काही महिन्यांत हजारो कंत्राटी कामगारांना रोजगार गमवावा लागल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. मोठय़ा उद्योगांवर अवलंबून असणाऱ्या उद्योगांना मंदीला तोंड द्यावे लागत आहे. काही उद्योगांचे कोटय़वधीचे नुकसान झाले आहे. दर महिन्याला नुकसानीत भर पडत असल्याने संबंधितांनी कामगार संघटनांशी चर्चा करून परिस्थितीची जाणीव करून देण्यास सुरुवात केली.  काम नसल्याने कंत्राटी कामगारांना आधीच काढून टाकले गेले. आता व्यवस्थापनाचे लक्ष कायमस्वरूपी कामगारांवर आहे. महिंद्रा, टाटा मोटर्स या उद्योगांवर अवलंबून असणाऱ्या एएलएफ इंजिनीअर्सने सीटू कामगार संघटनेला पत्र देऊन कामगारांना अन्य प्रकल्पात पाठविण्याचे संकेत दिले आहेत. महिंद्राकडून मिळणारे काम कमी झाल्यामुळे उद्भवलेल्या स्थितीला तोंड देण्यासाठी काही ठोस पावले उचलावी लागतील. त्या अंतर्गत सक्षम कर्मचाऱ्यांना कंपनीच्या अन्य प्रकल्पांत पाठविले जाणार असल्याचे म्हटले आहे. ज्या प्रकल्पात त्यांची आवश्यकता आहे, तिथे कामगारांना पाठविले जाईल. तसेच ग्राहकाने प्रकल्प बंद ठेवल्यास आपल्याला आपले काम बंद करावे लागेल, असे सीटू कामगार संघटनेला कळविण्यात आले आहे. वाहन उद्योगातील मंदीमुळे महिन्यागणिक नुकसानीत भर पडत आहे. आनंद आय पॉवर लिमिटेडने त्याचा संदर्भ देऊन या संकटात एकेक दिवस काढणे अवघड होत असल्याचे म्हटले आहे. काम पूर्णपणे बंद असण्याच्या काळात निम्मे दिवस कामगारांच्या वार्षिक सुटीतील गृहीत धरावे, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. त्यास कामगार संघटना सहकार्य करीत नसून मंदीच्या काळात देयके देणे अवघड झाल्याचा मुद्दा व्यवस्थापनाने मांडला आहे.

उद्योग अडचणीत आले आहेत

मंदीच्या पाश्र्वभूमीवर, उद्योग अडचणीत आल्याची बाब सीटूचे प्रमुख पदाधिकारी डॉ. डी. एल. कराड यांनी मान्य केली. उद्योगजगताला मंदीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने उपाय योजण्याची गरज आहे. परंतु मंदीच्या वातावरणात काही उद्योग जाणीवपूर्वक मनुष्यबळ कपातीचे धोरण अवलंबण्याची शक्यता आहे. मोठय़ा उद्योगांना कंत्राटी कामगारांना काही महिने सांभाळणे अवघड नव्हते. मध्यम उद्योगांनी अवलंबिलेले धोरण अमान्य आहे. वेतनवाढीचे करार पुढे ढकलण्यासाठी याचा वापर होण्याची शक्यता आहे. काही कारखान्यांमध्ये स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) योजना लागू केली. कामगारांनी तो पर्याय स्वीकारू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. उद्योग अडचणीत असताना कामगार संघटनेची सहकार्याची भूमिका आहे. उद्योगांनी कामगारांना समजून घ्यावे, ही अपेक्षा असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.