नंदुरबार : मानव विकास निर्देशांकात खालच्या क्रमांकावर असलेल्या आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील १०८ या रुग्णवाहिकेची सेवा आठवड्याभरापासून बंद असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अपघातातील जखमींना तासनतास रस्त्यावरच मरण यातना सोसाव्या लागत आहेत. धडगाव तालुक्यातील काकर्दे गावानजीक सोमवारी दुपारी चारच्या सुमारास दोन दुचाकींचा अपघात झाला. या अपघातातील तीन जखमी तब्बल पाऊण तास रस्त्यावर रुग्णवाहिकेच्या प्रतिक्षेत पडून होते.

रुग्णवाहिका न आल्याने अखरे ग्रामस्थांनी दुचाकीवर टाकून तीन ते चार किलोमीटरचा प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यतचा प्रवास केला. रायसिंग पोतले, काळूसिंग वसावे, वसंत रहासे या रुग्णांना जबर मार लागला असल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्रातही १०२ ही रुग्णवाहिका नादूरुस्त असल्याने अखेर काकर्दे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक आणि पथकाने खासगी गाडी करुन एका रुग्णाला म्हसावद ग्रामीण रुग्णालयात संदर्भित केले. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी अपघातानंतर १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेसाठी संपर्क केला. मात्र धडगाव उपजिल्हा रुग्णालय आणि बिलगाव याठिकाणी कार्यरत दोन्ही १०८ या रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. पाऊण तास उशीर झाला असतानाही दूरची रुग्णवाहिका पाठवायची का, असा प्रश्न मदतवाहिनी केंद्रावरुन विचारण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१०८ रुग्णवाहिकेचे जिल्हा समन्वयकांनी याबाबत थेट भ्रमणध्वनीवरुन न विचारता आपण १०८ क्रमांकावरच संपर्क करा, असे उत्तर देण्यात आले. यासंदर्भात सामान्य रुग्णालयातील १०८ चे शासन समन्वयक यांना विचारणा केली असता आठवडाभरापासून धडगाव तालुक्यातील धडगाव , बिलगाव, तोरणमाळ आणि म्हसावद या चार ठिकाणच्या रुग्णवाहिका नादूरुस्त असल्याची माहिती मिळाली. त्यामुळेच अपघात, प्रसूती सारख्या अतिसंवेदनशील रुग्णांची काय अवस्था होत असेल, याबाबत कल्पना न केलेलीच बरी. नंदुरबार जिल्ह्यातील १०८ या रुग्णवाहिकांची अवस्था मरणासन्न झाली आहे. रुग्णालयाच्या कामापेक्षा रुग्णवाहिका गॅरेजमध्येच दुरुस्तीसाठी अधिक वेळ राहत आहेत. १०८ या रुग्णवाहिकांच्या समन्वयकाशी बोलून याबाबत प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल. डॉ, मिताली सेठी ( जिल्हाधिकारी, नंदुरबार)