शहर परिसरात वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. देवळाली कॅम्प भागात मोटारसायकल संरक्षक भिंतीला धडकून अपघात झाला. तर दुसरा अपघात उड्डाण पुलावर मोटारसायकल घसरून झाला. देवळाली कॅम्प येथील अपघातात आनंदचंद्र राय यांचा मृत्यू झाला. राय हे सुधाकर शिंदे (संजय गांधीनगर, देवळाली कॅम्प ) यांच्या समवेत दुचाकीवरून जात होते.

हेही वाचा >>> पेपर मिलला आग; कोट्यवधींचे नुकसान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरधाव दुचाकीवरील चालकाचा ताबा सुटून ती बना चाळच्या संरक्षक भिंतीला धडकली. या अपघातात चालक शिंदे हे जखमी झाले तर राय यांचा मृत्यू झाला. दुचाकीचेही नुकसान झाले. प्रकरणी चालक सुधाकर शिंदे यांच्या विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा अपघात शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलावर झाला. त्यात राजू घोडके (६६, राजपाल कॉलनी, मखमलाबाद नाका) यांचा मृत्यू झाला. घोडके हे भद्रकालीतून आडगावकडे मोटारसायकलने निघाले होते. उड्डाण पुलावर द्वारका परिसरात दुचाकी घसरली. त्यांच्या डोक्याला मार लागला. नागरिकांनी त्यांना तातडीने आडगावस्थित वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.