नाशिक – जिल्हा परिषदेत प्रदीर्घ काळापासून ठाण मांडून बसलेल्या विभागप्रमुखांकडून लैंगिक छळ होत असल्याच्या पुराव्यांसह तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाची जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीने दखल घेतली आहे. या अधिकाऱ्याविरुध्द ३० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशाखा समितीकडे आलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीमुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी यांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारीकडून लैंगिक छळ होत असल्याच्या पुराव्यासह तक्रारी समितीकडे प्राप्त झाल्या. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी चौकशीचे आदेश दिले. संबंधित अधिकाऱ्याविषयी प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी सुरू आहे.
यासाठी एक समिती गठीत करण्यात आली असून पुढील आठ दिवसात याबाबत अहवाल प्राप्त होईल. यामध्ये दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. तूर्तास समिती किंवा तक्रारी याचे कामकाज गोपनीय असल्याने त्यांनी मौन बाळगले. आतापर्यंत या अधिकाऱ्याविरूध्द ३० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याने महिलांना वेगवेगळी आमिषे दाखवत त्रास दिला. त्यांचा लैंगिक छळ केला आहे. त्याचे तात्पुरता निलंबन करण्यात आले असून त्याचा पदभार अन्य पदाधिकाऱ्याकडे देण्यात आला असल्याची माहिती मित्तल यांनी दिली.