नाशिक – सुरूवातीपासून रखडलेली इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया अद्यापही संथपणे सुरू आहे. नाशिक विभागात आतापर्यंत ६१,५८२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. ही टक्केवारी ३९.४ टक्केच असून प्रवेशाची टक्केवारी घसरण्याच्या कारणांचा शोध शिक्षण विभाग घेत आहे. मंगळवारी अकरावी प्रवेशासाठी दुसरी यादी जाहीर होणार आहे.
दहावीचा निकाल जाहीर होऊन महिन्याहून अधिक कालावधी लोटला. यंदा पहिल्यांदाच शहरासह ग्रामीण भागात एकाचवेळी आभासी पध्दतीने प्रवेश प्रक्रिया प्रारंभ झाली. यामध्ये विद्यार्थ्यांना राज्यातील आपल्या आवडीची १० महाविद्यालये निवडण्याची मुभा दिली गेली. सुरूवातीपासूनच तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया रखडली. दोन वेळेस वेळापत्रक बदलण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली.
नाशिक विभागात जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबारमधून ६१,५८२ विद्यार्थी पहिल्या यादीनुसार प्रवेशास पात्र ठरले. यादी जाहीर होऊन सहा दिवसांहून अधिक कालावधी लोटला असला तरी विभागात आतापर्यंत केवळ ३९.४ टक्के प्रवेश झाले आहेत. यामध्ये नंदुरबार जिल्हा (३७.५३ टक्के) मागे असून धुळे जिल्हा आघाडीवर (४२.१६) आहे. जळगाव जिल्ह्याचे ४१.५, नाशिकचे ३७.७२ टक्के प्रवेश झाले आहेत.
दरम्यान, निकालाचा टक्का घसरल्याने काही जागा रिक्त राहतील, असा अंदाज सुरूवातीपासून वर्तविण्यात येत होता. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशाची टक्केवारी पाहता विद्यार्थ्यांचा कल नेमका कुठे, याचा शोध शिक्षण विभाग घेत आहे. खासगी शिकवणी वर्गांचे कनिष्ठ महाविद्यालयांशी होणारे करार, यातून तयार होणारी मक्तेदारी, यामुळेच राज्यस्तरावर शहर तसेच ग्रामीण भागात एकाच वेळी आभासी पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणशैलीकडे पाठ फिरवली की तांत्रिक घोळाला विद्यार्थी कंटाळले याची शैक्षणिक वर्तुळात चर्चा सुरू आहे.
विद्यार्थ्यांच्या कलात बदल
काही वर्षात विद्यार्थी पदविका किंवा अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमास पसंती देत आहेत. यामुळे दोन ते तीन वर्षात रिक्त जागांचे प्रमाण वाढले. यंदा पहिल्या यादीत प्रवेशाची टक्केवारी कमी आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत पसंतीचे महाविद्यालय मिळाले नसल्याने ही टक्केवारी कमी आहे. दुसरी यादी जाहीर झाल्यावर हे प्रमाण वाढेल – संजय राठोड (शिक्षण उपसंचालक, नाशिक)