नाशिक – संस्थेच्या नाम साधर्म्याचा गैरवापर करून भूमाफियांनी बनावट कागदपत्रे सादर करून पाथर्डी गावातील गट क्रमांक २०५/२ यातील तीन एकर १२ गुंठे आदिवासी जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी मयूर आगरकर यांनी तक्रार दिली. त्यावरून रमेश पाडेकर (गंगापूर रोड), पुंडलिक बोबळे (खुटवडनगर), किशोर गाढवे (पोलीस मुख्यालय, गंगापूर रोड), सुरेश कराठे (रविवार पेठ), अरूण पवार (कामटवाडे), सदाशिव कोकाटे (जेलरोड), गुलाब पवार (स्नेहबंधन पार्क, शरणपूर रोड), बेबी जाधव (पंचवटी), सुलोचना डंबाळे (रामवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती ॲड. विजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संशयित पाडेकर यांच्यासह आठ सदस्यांनी संगनमत करत ‘भोलेनाथ आदिवासी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. नाशिक’ या नावाने सहा फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक येथे नवीन संस्थेची नोंदणी केली. आधीच्या संस्थेच्या नावात साम्य असल्याचा गैरफायदा घेताना पाथर्डी येथील सुमारे एक हेक्टर २४ आर भूखंडावर हक्क सांगितला होता. मात्र प्रशासनाच्या पातळीवर ही बनवाबनवी उघडकीस आली.

विसर्जित झालेल्या भोलेनाथ आदिवासी इतर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. नाशिक या नावाने संस्थेची नोंदणी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात २३ डिसेंबर १९९४ रोजी केलेली होती. जमीनमालक माधव डामसे यांनी १९९२ साली ही जमीन विकत घेतली होती. यानंतर १९९५ मध्ये डामसे यांनी नियोजित भोलेनाथ आदिवासी सोसायटीच्या नावाने दुरुस्तीपत्रक नोंदविले होते.

सोसायटी बनविण्यासाठी त्यांनी आजपर्यंत कधीही सोसायटी नोंदणी (रजिस्ट्रेशन) केली नाही. डामसे मयत झाल्यावर संस्थेच्या नावातील साधर्म्याचा गैरवापर करत काही भूमाफियानी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका यांच्याकडे बनावट कागदपत्रे सादर केली. आदिवासी जमीन बेकायदेशीररित्या बळकावण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

नामसाधर्म्याचा फायदा घेऊन विषयांकित मिळकतीशी हितसंबंध दर्शवत प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करावा, असे निर्देश सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्पित चौहान यांनी दिले. त्यानंतर ही प्रक्रिया पार पडल्याची माहिती ॲड. शिंदे यांनी दिली.