नाशिक : तीची वैष्णवी हगवणे होऊ देऊ नका, ही भावाने केलेली आर्त विनवणी उपस्थितांना अस्वस्थ करून गेली. काहींनी कौटुंबिक हिंसाचाराच्या तर काहींनी पती-पत्नी यांच्यातील भांडणाच्या तक्रारी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित जनसुनावणीत केल्या.

एकाने बहिणीला लग्नानंतर कसा त्रास दिला जात आहे, ते जनसुनावणीत मांडले. पुण्यातील मुलाशी लग्न ठरल्यावर त्यांनी ५२ वस्तुंची यादी दिली. त्यानंतर लग्नाला येण्या-जाण्यासाठी कशा गाड्या हव्यात, ते सांगितले. लग्न झाल्यानंतरही मागणे सुरुच राहिले. मागणी पूर्ण न झाल्यास बहिणीला मारहाण ठरलेली.

तिला मुलगी झाल्यावर छोटीला काही करायचे नाही. पण हिला मारा, असे सासुचे सांगणे. तिची वैष्णवी होऊ देऊ नका, अशी विनवणी त्याने केली. काहींनी लग्नानंतर वेगवेगळ्या गोष्टींसाठी सासरकडून कसा त्रास दिला जात आहे, त्याचा पाढा वाचला. एका विवाहितेने अजब मागणी केली. आम्ही दोघे नवरा बायको कमावतो. त्याने लग्नानंतर महिन्याचा निम्मा खर्च तु कर असे सांगितल्याने घटस्फोट हवा असल्याचे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक वृध्दा मुलीविषयी तक्रार घेऊन आली होती. मुलीचे लग्न लावून दिले. तिला मिळकतीमधील हिस्साही दिला. पण तिला संपूर्ण मालमत्ता हवी होती. शासकीय घरकुल योजनेतील घरावर तिने दावा केला. तिला दोन्ही भावांनी विरोध केला. तिने सख्खा भावांविरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे. हे प्रकरण इथेच थांबले नाही. तिच्या मुलीलाही यामध्ये गोवत मामाने अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. यामुळे घर गेले. ती कधीही येते. मारझोड करते. शिवीगाळ करुन निघून जाते, अशी तक्रार केली. या तक्रारीने आयोगाचे सदस्यही अवाक झाले.