नाशिक : पंचवटीतील विडी कामगार नगर येथे बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडाल्याने तीन मुलांच्या मृत्युचे प्रकरण चर्चेत असतांना अवघ्या ४८ तासात या घटनेची पुनरावृत्ती सातपूर परिसरातील भोर टाऊनशिपमध्ये घडली. मुलांच्या मृत्युला कारणीभूत असलेल्या बांधकाम व्यावसायिक, प्रशासकीय अनास्थेला शिक्षा कोण करणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

नाशिक शहराचा विकास वेगाने होत असतांना या विकासाच्या दुसऱ्या बाजूचे अनुभवही येऊ लागले आहेत. मोकळ्या भूखंडावर मजल्यावर मजले चढत असतांना काही बांधकाम व्यावसायिकांकडून सर्व नियम धाब्यावर बसविण्यात येत आहेत. इमारत बांधकामासाठी कामगारांची सुरक्षा त्यांच्यासाठी गौण भाग झाला आहे. बांधकामाच्या वेळी परिसरातील लोकांना त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी बांधकाम व्यावसायिकांकडून घेतली जात नाही.

विडी कामगार नगर परिसरातील घटनेतून बांधकाम व्यावसायिकाची ही अनास्था ठळकपणे नजरेस आल्यानंतरही महापालिका प्रशासन, नगररचना विभाग ढिम्म आहे. सातपूर येथील भोर टाऊनशिपजवळ एका गृह प्रकल्पासाठी खड्डा खोदण्यात आला आहे. शहरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले. व्यावसायिकाकडून प्रकल्पाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा भिंत, सावधानतेचा इशारा देणारा फलक लावण्यात आलेला नाही. ही बेफिकिरी नऊ वर्षीय मयूर संजय भोंडवे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरली.

बुधवारी रात्री मयूर मित्रांबरोबर परिसरात खेळत होता. अंधार असल्याने त्याला खड्ड्याचा अंदाज न आल्याने तो पडला. हा प्रकार बाजूला असलेल्या आझाद शेख याच्या लक्षात आला. त्याने प्रसंगावधान राखत मयूरला वाचविण्याचा प्रयत्न केला. खड्ड्यातून बाहेर काढत त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रात्री ११ वाजता त्याचा मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विडी कामगार नगर आणि सातपूर येथील दोन्ही घटनांमध्ये कुठेही सुरक्षिततेच्या उपाययोजना दिसून आलेल्या नाहीत. मनपा प्रशासन आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकांची बेपर्वाईच या मृत्युंना कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अंबड पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली आहे.