मालेगाव : बंदिस्त कालव्याविरोधातील आंदोलकाचा विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न|a protester against the closed canal attempted suicide by consuming poison in malegaon nashik | Loksatta

मालेगाव: बंदिस्त कालव्याविरोधातील आंदोलकाचा विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न

बाष्पीभवन व अन्य कारणांमुळे पारंपरिक कालव्यांमधील पाण्याचा अपव्यय होत असल्याने तालुक्यातील दहीकुटे व बोरी आंबेदरी धरणाचे पाणी लाभ क्षेत्रातील सर्व गावांना मिळत नाही.

मालेगाव: बंदिस्त कालव्याविरोधातील आंदोलकाचा विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न
मालेगाव : बंदिस्त कालव्याविरोधातील आंदोलकाचा विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील बोरी आंबेदरी धरणाच्या बंदिस्त कालव्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांपैकी गणेश कचवे (३५) या तरुणाने शनिवारी विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. २७ दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा निघत नसल्याने आलेल्या वैफल्यामुळे गणेशने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. त्याला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बाष्पीभवन व अन्य कारणांमुळे पारंपरिक कालव्यांमधील पाण्याचा अपव्यय होत असल्याने तालुक्यातील दहीकुटे व बोरी आंबेदरी धरणाचे पाणी लाभ क्षेत्रातील सर्व गावांना मिळत नाही. त्यामुळे पारंपरिक कालव्यांऐवजी या दोन्ही धरणांमधून बंदिस्त कालवे करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार या कामांचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. परंतु दहिदी परिसरातील गावांनी बंदिस्त कालव्यांना विरोध दर्शविल्याने आंबेदरी धरणातून काढण्यात येणाऱ्या बंदिस्त कालव्याचे काम सुरू होऊ शकले नाही.

हेही वाचा: “सोलापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल, तर आम्हाला…”, संजय राऊतांचे मुख्यमंत्री बोम्मईंना प्रत्युत्तर

बंदिस्त कालव्यामुळे आमच्या शेतास पाणी मिळणे दुरापास्त होईल अशी भीती व्यक्त करत तेथील महिला-पुरुष शेतकऱ्यांनी सात नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. दुसरीकडे पारंपरिक कालव्यामुळे माळमाथ्यावरील दुष्काळी गावांना पाणी पोहोचत नाही,अशी तक्रार करणाऱ्या झोडगे परिसरातील शेतकऱ्यांनी बंदिस्त कालव्याचे समर्थन करत हे काम त्वरित सुरू करावे,यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. परस्परविरोधी मागणीच्या या विषयावरून एकप्रकारे पेच निर्माण झाला आहे. बंदिस्त कालव्यामुळे पाण्याची बचत होईल,आणि लाभक्षेत्रातील सर्व गावांपर्यंत पाणी पोहोचण्यास मदत होईल,अशी भूमिका मांडत पालकमंत्री दादा भुसे यांनी गेल्या आठवड्यात आंदोलनस्थळी भेट देऊन वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने भुसे यांना रिक्तहस्ते परतावे लागले. त्यामुळे गेल्या २७ दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाची कोंडी अद्याप फुटू शकली नाही.

हेही वाचा: “शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना शिव्या देत असतील तर…”, संजय राऊतांचे शिंदे गटातील आमदारांना आव्हान

दरम्यान,शेतातील कामधंदा सोडून इतके दिवस सुरु असलेल्या या आंदोलनाची शासन पातळीवरुन दखल घेतली जात नाही,असा समज आता आंदोलकाचा होऊ लागला आहे. तसेच हा विरोध मोडून हे काम रेटून नेण्याचा प्रयत्न होईल की काय,अशी भीतीदेखील आंदोलकांना वाटत आहे. यामुळे वैफल्य आल्याने गणेश याने विषारी पदार्थ सेवन केल्याचे सांगण्यात आले. सकाळी १० वाजेच्या सुमारास गणेशने सोबत आणलेल्या बाटलीतील विषारी पदार्थ आंदोलनाच्या ठिकाणीच सेवन केले. ही बाब अन्य आंदोलकांच्या लक्षात येताच त्याला त्वरीत मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अत्यवस्थ असल्याने सामान्य रुग्णालयातून नंतर खासगी रुग्णालयात त्याला हलविण्यात आले आहे.

विष घेतानाची चित्रफित…
विषारी पदार्थ सेवन करत असताना गणेश याने मोबाईलद्वारे एक चित्रफित बनवली आहे. त्यात मी विषारी पावडर पित असून माझे कुटूंब उद्ध्वस्थ होण्यास पालक मंत्री तुम्ही जबाबदार आहात,अशा आशयाचे विधान करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 15:43 IST
Next Story
“सोलापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल, तर आम्हाला…”, संजय राऊतांचे मुख्यमंत्री बोम्मईंना प्रत्युत्तर