नाशिक – पंचवटीतील श्री काळाराम मंदिर परिसरात प्रस्तावित रामकाल पथ प्रकल्पासाठी रस्ता रुंदीकरणासह अन्य कामांसाठी ५४७ चौरस मीटर तर वाहनतळासाठी आरक्षित जागेपैकी २४ हजार चौरस मीटर म्हणजे सुमारे सहा एकर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. यात रस्ता रुंदीकरणासाठी तब्बल २१ कोटींच्या भूसंपादनास महापालिकेने हिरवा कंदील दाखवला आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, रामकाल पथ प्रकल्पांतर्गत सितागुंफा ते काळाराम मंदिर, सरदार चौक ते रामकुंड रस्ता आणि रामकुंड परिसर सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यामध्ये सितागुंफा रस्ता रुंदीकरण, काळाराम मंदिर चौक ते उद्यान सुशोभिकरण, काळाराम मंदिर ते रामकुंड रस्ता आणि रामकुंड परिसर रुंदीकरण व सुशोभिकरणाचा अंतर्भाव आहे. विकास आराखड्यानुसार सितागुंफा ते काळाराम मंदिर विकास योजना रस्ता नऊ मीटर, काळाराम मंदिर ते सरदार चौक रस्ता नऊ मीटर, सरदार चौक ते रामकुंड रस्ता १२ मीटर प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी क्षेत्र संपादन करावे लागणार आहे.
विकास आराखड्यानुसार गोदावरी आणि काळाराम मंदिरालगत सर्वे क्रमांक ३०८, ३०९, ३१० व ३१२ या क्षेत्रावर आरक्षण क्रमांक १६१ व १६२ नुसार ६७ हजार २२५ चौरस मीटर क्षेत्र अनुक्रमे वाहनतळासाठी आणि अग्निशमन केंद्रासाठी (२०५० चौरस मीटर) आरक्षित केलेले आहे. सध्या या क्षेत्रातील २४ हजार चौरस मीटर क्षेत्र (पाच ते सहा एकर) इतके क्षेत्र ताब्यात घेऊन वाहनतळासाठी वापर केला जाईल. या विविध कामांसाठी पंचवटी गावठाणातील २४ हजार ५४७. १७ चौरस मीटर क्षेत्राचे भूसंपादन करण्यात येणार आहे. वाहनतळा्ची आरक्षित जागा वगळता उर्वरित भूसंपादनासाठी सुमारे २१ कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.
भूसंपादन किती ? कुठे ?
काळाराम मंदिर चौक (पूर्व बाजू) – ११७.७७ चौरस मीटर (चार कोटी ४६ लाख)
काळाराम मंदिर चौक ते लक्ष्मण गुफा – १०८.०७ चौरस मीटर (चार कोटी नऊ लाख)
काळाराम मंदिर ते सरदार चौक दक्षिण बाजू – २२.५६ चौरस मीटर (८५ लाख ४५ हजार)
काळाराम मंदिर ते सरदार चौक उत्तर बाजू – ११७.१० चौरस मीटर (चार कोटी ४३ लाख)
देवी मंदिर चौक, उत्तर बाजू – १३९.८४ चौरस मीटर (पाच कोटी २९ लाख)
तांबोळी (श्रीराम मंदिर) – १६.३२ चौरस मीटर (६१ लाख ८२ हजार)
कपालेश्वर मंदिर चौक – ३३.४० चौरस मीटर (एक कोटी २६ लाख)
वाहनतळासाठी – २४ हजार चौरस मीटर