नाशिक : मुंबईकरांचे जीवन जिच्यावर अवलंबून आहे, त्या “मुंबई लोकल” चे नाव डोळ्यांसमोर येताच मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकातील तुडुंब गर्दी, लोकल फलाटावर उभी राहण्याच्या आता तिच्यातून उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी होणारी चुरस, हे चित्र दिसते. त्यामुळे जेव्हा “मुंबई लोकल” नाशिक जिल्ह्यात धडक देणार असल्याचे कळल्यावर सर्वांनाच धक्का बसला. परंतु, खरोखर “मुंबई लोकल” नाशिक जिल्ह्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही ती गेली. तिला प्रतिसादही मिळाला.
लोकलच्या दैनंदिन गर्दीत फुलणारी प्रेमकथा मांडणाऱ्या “मुंबई लोकल” या चित्रपटातील अभिनेता प्रथमेश परब आणि इतर कलाकारांनी एज्युकेशन सोसायटी संचलित नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील बी. पी. पाटील महाविद्यालयात चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांबरोबर सर्वच कलाकारांनी धम्माल केली. अभिनेता प्रथमेश परबने आपल्या खास शैलीत करिअर आणि आयुष्यावर मार्गदर्शन केले.
मुंबई लोकल पिंपळगाव बसवंतसारख्या ग्रामीण भागातील महाविद्यालयात धडकल्याने प्रारंभी विद्यार्थीही चकित झाले होते. परंतु, चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर त्यांना त्याचे कारण कळले. “मुंबई लोकल” या चित्रपटात तरुणांच्या आयुष्यातील संघर्ष आणि शहरी जीवनातील धकाधकीचे वास्तव आणि त्यातून अनोळखी व्यक्तीबरोबर झालेले प्रेम या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नवोदित निर्मात्यांनी हा चित्रपट साकारला असून प्रथमेश परब यांच्या अभिनयाने त्याला विशेष उंची मिळाली आहे. चित्रपटातील कलाकारांना पाहण्यासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. ‘टाइमपास’ चित्रपटातील ‘दगडू’च्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला प्रथमेश परब दिसताच विद्यार्थ्यांनी जल्लोषात त्याचे स्वागत केले. सेल्फी, गप्पा, संवादांची नक्कल यामुळे संपूर्ण वातावरण उत्साही झाले होते. यावेळी प्रथमेश परबने विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.
विद्यार्थ्यांनी प्रेमाच्या लोकलमध्ये नक्कीच धावावे, पण आधी अभ्यासाकडे लक्ष द्यावे, चांगले गुण मिळवा आणि यशस्वी व्हा, असा सल्ला त्याने दिला. प्रेमापेक्षा आपले करिअर महत्त्वाचे आहे; करिअर झाले की प्रेम आपोआप मिळते, असे त्याने सांगितले.
या कार्यक्रमात अभिनेता संजय कुलकर्णी, निर्माते निलेश राठी, अभिनेत्री प्राची राऊत, त्र्यंबक ढाका तसेच निफाड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व माजी सरपंच भास्कर बनकर, सचिन अग्रवाल, तन्वी माहेश्वरी, बाळासाहेब भूतडा, रवींद्र आवारे, बी. पी. पाटील महाविद्यालयाचे व्यवस्थापक दिनेश अनारसे, प्राचार्य प्रकाश भंडारे, पिंपळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. बी. जाधव, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका फरजाना शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या वतीने प्रथमेश परब यांचा विशेष सत्कार करण्यात आला.