नाशिक – बदलत जाणारे जीवनमान, त्याचा गुन्हेगारी विश्वावर होणारा परिणाम, त्यातून बदलत जाणारी गुन्हेगारी, या अनुषंगाने अंमलदारांना आधुनिक तपास पध्दती, सायबर गुन्हे तसेच तांत्रिक पुरावे गोळा करणे आदी विषयांवर लक्ष केंद्रीत करण्याविषयी राज्याचे अपर पोलीस महासंचालक तथा प्रशिक्षण व खास पथकाचे प्रवीण पडवळ यांनी सूचना केल्या.
येथील गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयास पडवळ यांनी भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी विद्यालयात पदवीधर पोलीस अंमलदारांना देण्यात येत असलेल्या गुन्हे तपासाच्या प्रशिक्षणाचा सखोल आढावा घेतला. पडवळ यांनी प्रथम प्रशिक्षण विद्यालयाच्या कामकाजाची आणि सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती घेतली. विशेषतः, पदवीधर पोलीस अंमलदारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘गुन्हे तपास’ प्रशिक्षणावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. बदलत्या गुन्हेगारीचे स्वरूप लक्षात घेता, अंमलदारांना आधुनिक तपास पद्धती, सायबर गुन्हे, तांत्रिक पुरावे गोळा करणे आणि कायदेशीर बाबींची पूर्तता याविषयी दिले जाणारे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी प्रशिक्षणाचा दर्जा आणि अभ्यासक्रम याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रशिक्षणाचा आढावा घेतल्यानंतर पडवळ यांनी सर्व प्रशिक्षणार्थी अंमलदारांशी संवाद साधला. त्यांना मार्गदर्शन केले.
गुन्ह्यांचा तपास हा पोलीस दलाचा कणा आहे, असे सांगत त्यांनी निष्पक्ष, जलद आणि शास्त्रोक्त पद्धतीने तपास करण्याचे महत्त्व पटवून दिले. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी संवेदनशीलतेने आणि व्यावसायिकतेने काम करावे, अशा सूचना केल्या. अपर पोलीस महासंचालकांच्या या भेटीमुळे आणि मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणार्थी अंमलदारांचा उत्साह द्विगुणित झाला. या भेटीवेळी गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गवळी, उपप्राचार्य मनोज खंडाळे आदी उपस्थित होते.
