येवला : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस होत आहे. राज्यात उद्योग, शेती यांसह वेगवेगळे सामाजिक प्रश्न उभे असतांना महायुती सरकार मात्र सारे काही आलबेल असल्याचा दावा करत आहे. खोक्याने ४० जणांचे भले झाले असले तरी राज्याला धोका झाल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

महाराष्ट्र स्वाभिमान सभा अभियानातंर्गत ठाकरे यांनी येवला येथे शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. पूर्वनियोजित वेळेपेक्षा दोन तास उशीराने मेळावा सुरू झाला. यावेळी ठाकरे यांनी विविध प्रश्नांवरुन राज्य सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टिकास्त्र सोडले. नाशिक- येवला रस्त्याची अवस्था बिकट आहे. एवढी वर्ष सत्ता, मंत्रीपद असताना यांना रस्ता नीट करता आला नाही. शहरात आजही टँकरने पाणीपुरवठा होत आहे, असे म्हणत ठाकरे यांनी भुजबळ यांना लक्ष्य केले.

हेही वाचा…पेसा भरतीसाठी वणीत रास्ता रोको, वाहतूक विस्कळीत

सरकारने राज्याची वाट लावली आहे. पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची नोंद घेण्यास सत्ताधारी तयार नाहीत. दोन वर्षात राज्यात एकही नवा उद्योग आला नाही. उलट काही उद्योग गुजरात गेले. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेत दुप्पट पैसे देण्याचे सांगितले जात आहे. हिंमत असेल तर आताच दुप्पट पैसे द्या, असे आवाहन ठाकरे यांनी केले. यांना महिलांविषयी आदर नाही. राज्यात महिलांना सुरक्षा नाही. भाजप धर्मांमध्ये आणि जातींमध्ये वाद लावत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

मनमाडमध्ये संघटित होण्याचे आवाहन

मनमाड येथे आमदार आदित्य ठाकरे यांनी स्वाभिमान सभेत शिवसैनिकांशी संवाद साधताना संघटित होण्याचे आवाहन केले. संविधान ते महाराष्ट्राचा स्वाभिमान अशी आमची लढाई आहे. या लढाईसाठी सर्वांच्या ताकदीची आणि एकतेच्या वज्रमुठीची गरज आहे. ही ताकद संपूर्ण महाराष्ट्रात दिसली पाहिजे. शेतीमालाला भाव नाही. या देशात केवळ संविधानाचे राज्य चालेल, हे लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले. आता विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी लढायला सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडका भाऊ कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा…लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका

येवल्यात कुणाल दराडे यांचे शक्तीप्रदर्शन

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची सभा असल्याने येवला येथे ठाकरे गटाकडून इच्छुक जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सभेच्या नियोजनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. शहर परिसरात मोठ्या आकारातील ठाकरे यांचे फलक, कटआऊट लावण्यात आले होते.

हेही वाचा…मविआ सत्तेत आल्यावर लुटारु मंत्री, अधिकाऱ्यांना कारागृहात टाकणार; आदित्य ठाकरे यांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छावा क्रांतिवीर सेनेकडून निवेदन

येवला दौऱ्यावर आलेलेले आमदार आदित्य ठाकरे यांना छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाविषयी केलेल्या मागणीविषयी आपल्या पक्षाची भूमिका काय, असा प्रश्न त्यांनी निवेदनाव्दारे केला.