नाशिक – राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णत: ढासळली आहे. बीड प्रकरण असो वा महिलांवरील वाढते अत्याचार. राज्यात सत्ताधारीही सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित करुन सत्तेत येण्यासाठी देण्यात आलेल्या कुठल्याही आश्वासनांची पूर्तता सत्ताधाऱ्यांकडून झालेली नाही, याकडे शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्राचा विकास होण्याऐवजी राज्य थांबले आहे. कुठल्याही विषयावर जाब विचारू नये, यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या वादात अडकवून ठेवण्यात येत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. नाशिक येथील गोविंदनगरातील मनोहर गार्डनमध्ये बुधवारी ठाकरे गटाचे निर्धार शिबीर होत आहे. या शिबिरात महाराष्ट्र चाललाय कुठे ? या विषयावर आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर खासदार संजय राऊत, राजन विचारे, खासदार राजाभाऊ वाजे, विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत आदी उपस्थित होते.
आदित्य यांनी राज्य सरकारच्या कारभारावर तोफ डागली. राज्य सरकार १०० दिवसांच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करत आहे. प्रत्यक्षात १०० दिवसात काय झाले, याचा विचार केल्यास विदारक चित्र समोर येते. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात जाती जातींमध्ये, धर्माधर्मात, गावागावात भांडणे लावण्यात येत आहेत. सामान्यांनी कुठलेही प्रश्न विचारू नयेत, यासाठी त्यांना अशा वेगवेगळ्या बाबींमध्ये अडकवले जात आहे. भाजपने सध्या इंग्रजांची फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबली आहे. याबद्दल प्रश्न विचारले तर गुन्हे दाखल होतात. राज्याला अंमली पदार्थाचा विळखा पडला आहे. या ड्रग्ज माफियांना पाठिंबा कोणाचा, या बाबत स्थानिक नेत्यांचा, लोकप्रतिनिधींचा सीडीआर तपासला जाणार का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
सत्ताधाऱ्यांनी सत्तेत येतांना दिलेल्या आश्वासनांच्या पावसात शेतकऱ्यांची सर्वाधिक फसवणूक झाली. त्यांना कर्जमुक्ती मिळालेली नाही. सातबारा कोरा झालेला नाही. राज्य सरकार महिला व शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही. उलट उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात आली होती. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्यासाठी विधेयक संमत करण्यात आले होते. राज्याला अवकाळी पावसाचा फटका बसलेला असतांना शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. लाडकी बहीण योजनेचा डंका पिटला जात असतांना निधीची चणचण सांगितली जाते. अशा स्थितीत मुख्यमंत्री विरोधकांना राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने आपण सगळ्यांनी एकत्र येत याविरूध्द काम केले पाहिजे, असे सांगतील अशी अपेक्षा होती. परंतु, तसे होतांना दिसत नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.
महाराष्ट्राने नेमके जायचे कुठे, बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीपेक्षा आम्हाला पालकमंत्री कोणाचा, हा वाद महत्वाचा वाटत आहे. केंद्रात सत्ता येण्यासाठी भाजपने दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. पुरोगामी महाराष्ट्राने या सगळ्यांचा विचार करण्याची वेळ आली आहे. राजकारण बदलत असते. आपलीही वेळ येईल. पण तोपर्यंत समाजाच्या प्रश्नांसाठी आपण लढले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. या एकदिवसीय निर्धार शिबिराचा समारोप पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे. शिबिराचे उद्घाटन आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.