नाशिक : मुंबई भोंगामुक्त झाल्यानंतर आता भोंगामुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा किरीट सोमय्या यांनी केली. या संदर्भात गुरुवारी छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथील पोलीस प्रमुखांची भेट घेतली. शुक्रवारी मिरारोड, वसई, भाईंदर आणि रविवारी पुणे येथे पोलीस प्रमुखांची भेट घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुरुवारी सोमय्या यांनी भोंगे हटविण्याच्या विषयावर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. नंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नाशिक शहर पोलिसांनी जवळपास सर्व भोंग्यांवर प्रतिबंध लावला आहे. हळूहळू भोंगे उतरविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. शहरात भोंग्यांचा आवाज पूर्णपणे बंद झाला आहे. कुठे भोंगा राहिला असेल तर आठवडाभरात तोही बंद केला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आल्याचे सोमय्या यांनी नमूद केले. आवाजाच्या कर्कश भिंती उभारण्याला परवानगी नाही. कोणी नियमांचे भंग करेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल.
महापालिका सतर्कतेचा इशारा देण्यासाठी भोंगे लावत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी देशात ध्वनिप्रदूषण कायदा अस्तित्वात असल्याकडे लक्ष वेधले. रात्री १० ते सकाळी सहा या वेळेत ध्वनिक्षेपक वापरता येत नाही. नियमाला एक अपवाद असतो. कायदा व व्यवस्थेसाठी, गणेशोत्सवात हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी शासकीय यंत्रणा त्याचा वापर करू शकते, असे सोमय्या यांनी सांगितले.
मालेगाव निकालावरून काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटावरही टीका मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर किरीट सोमय्या यांनी भाष्य केले. काही वर्षांपासून हिरवे वस्त्र परिधान केलेल्या उद्धव ठाकरे सेनेला मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर आतातरी हिंदुत्वाची जाणीव होईल. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी त्यांनी वडिलांचे विचार आणि धर्म बाजूला ठेवत तडजोडी केल्या. निकालानंतर टीका आणि प्रश्न विचारण्याचे धाडस ते करू शकतात, इथपर्यंत त्यांचे अध:पतन झाली असल्याची टीका सोमय्या यांनी केली.
या निकालामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी धडा शिकायला हवा. एका प्रसंगावरून हिंदू अतिरेकी म्हणायला गांधी परिवाराने सुरूवात केली. काँग्रेसचे नेते , तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी नाटकीय दृश्य उभे केले. अजूनही त्यांना पश्चाताप होत नाही. माफी मागत नाहीत. पण लोक त्यांना निश्चितपणे धडा शिकवतील, असे सोमय्या यांनी सूचित केले. मालेगाव बॉम्बस्फोट घटनेत तपास यंत्रणेने खऱ्या आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही, असा दावा त्यांनी केला. आता गांधी परिवार आणि यंत्रणांना हे का केले, असा प्रश्न केला जाईल. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला किंमत मोजावी लागली. आगामी निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होणार असल्याचे सोमय्या यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केल्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पक्षावर टिकास्त्र सोडले.