जळगाव, धुळे : जळगाव आणि धुळे जिल्ह्यात जनावरांच्या लम्पी आजाराने पुन्हा शिरकाव केला आहे. धुळे तालुक्यातील देवभाणे, सातरणे, न्याहळोद, विंचूर, सडगाव आणि साक्री तालुक्यातील अमोदे, वाघापूर, दिघावे या गावांमध्ये लम्पी या जनावरांच्या साथरोगाचा संसर्ग वाढला आहे. तर, जळगाव जिल्ह्यातील सात तालुके लम्पीबाधित झाले असून आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धुळे जिल्ह्यात या रोगाचा प्रसार अन्य ठिकाणी होऊ नये म्हणून संसर्ग क्षेत्रापासून पाच किलोमीटरचा परिसर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिनव गोयल यांनी बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल , पारोळा, अमळनेर व धरणगाव या सात तालुक्यांतील ७८ ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या तालुक्यांतील सर्व जनावरांचे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच लेप्टोस्पायरोसिसचा रुग्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लम्पी प्रादुर्भावग्रस्त गावांपासून पाच किलोमीटर परिसरातील जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. बाधित क्षेत्राच्या भोवताल परिघातील सर्व गावांतील फक्त गोवर्गीय जनावरांना गोट पॅाक्स लसीची मात्रा देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये व रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामधून पशुधनाची होणारी खरेदी-विक्री व प्रत्यक्ष वाहतूक प्रतिबंधीत करण्यात येत आहे