जळगाव – केवळ हगवणेच नव्हे तर, तुमच्या पक्षात जे लोक येत आहेत ते तपासा, असा सल्ला आपण अजितदादांना आधीच दिला आहे, असे लक्षात आणून देत शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री गुलाबराव पाटील यांनी अलीकडेच अजित पवार गटात प्रवेश केलेले जिल्ह्याचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना लक्ष्य केले.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हुंड्यासाठी छळ झाल्याने अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची सून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. त्यावरुन विरोधकांकडून अजित पवार यांच्यावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी त्यांचे जळगाव ग्रामीणमधील कट्टर विरोधक आणि राष्ट्रवादीतून (शरद पवार) अजित पवार गटात प्रवेश केलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना नाव न घेता लक्ष्य करण्याची संधी साधली. जळगाव जिल्ह्यातील काही लोक तुम्ही पक्षात घेतले आहेत. त्यांचीही अशीच प्रकरणे काही दिवसांनी बाहेर येतील, असा इशारादेखील त्यांनी अजित पवार यांना देवकर यांचा नामोल्लेख टाळून दिला.
माजी मंत्री देवकर यांना पक्षात घेतल्याने अजित पवार यांना पुढे पश्चाताप होईल. कारण, देवकर यांची जिल्हा बँकेतून १० कोटींचे नियमबाह्य कर्ज घेतल्याची चौकशी सुरू आहे. इतरही अनेक प्रकरणात त्यांचे नाव असल्याचे वक्तव्य मंत्री पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर देवकर यांनीही त्यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्रीपदाचे भान ठेवा. तोल जाऊ देऊ नका. व्यवस्थित बोला, असा इशारा दिला होता.