जळगाव : जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा स्थितीत अमळनेर पोलीसांनी विविध ठिकाणाहून चोरीला गेलेल्या सुमारे १५ लाखांपेक्षा अधिक किमतीच्या २४ दुचाकींसह दोन संशयितांना नंदुरबार जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.

हिमंत रेंहज्या पावरा आणि अंबालाल भुरट्या खरर्डे (दोन्ही रा. सातपिंप्री, ता. शहादा, जि. नंदुरबार) अशी पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत. अमळनेर पोलीसांनी अत्यंत शिताफीने धडगाव परिसरातील डोंगराळ भागात सापळा रचून दोन्ही संशयितांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

कसून चौकशी केल्यानंतर दोघांनी अमळनेर तसेच इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून असंख्य दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलीसांनी त्यांच्या सांगण्यावरून सातपिंप्री येथील जंगल परिसर पिंजून काढत चोरीच्या एकूण २४ दुचाकी हस्तगत केल्या. जप्त करण्यात आलेल्या दुचाकी प्रामुख्याने होंडा यूनिकॉर्न, होंडा शाईन, बजाज पल्सर, टीव्हीएस रायडर, हीरो स्प्लेंडर, अशा विविध कंपनींच्या आहेत. आणि त्यांची एकत्रित किंमत १५ लाख ६३ हजार रूपये इतकी आहे.

अमळनेर पोलीस ठाण्यात यापूर्वी नोंदविण्यात आलेल्या गुन्हे क्रमांक ३०८/२०२५, २९९/२०२५ आणि २३३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(दोन) प्रमाणे दाखल चोरीच्या दुचाकींचा शोध सुरु होता. तपासादरम्यान पोलीसांनी सीसीटीव्ही चित्रण, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. या तपासातून चोरी करणारे हिंमत रेंहज्या पावरा आणि अंबालाल भुरट्या खरर्डे (दोन्ही रा. सातपिंप्री) हे चोरटे असल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक शरद काकळीज, हवालदार प्रशांत पाटील, गणेश पाटील, उज्वलकुमार म्हसके, नितीन मनोरे, उज्वल पाटील, हितेश बेहरे यांनी सदरची कारवाई यशस्वी केली.

सदर गुन्ह्याचा तपास हवालदार काशिनाथ आणि सागर साळुंखे हे करीत आहेत. ताब्यातील दोन्ही संशयितांकडून हस्तगत केलेल्या सर्व दुचाकी पंचनामा करून अमळनेर पोलीस ठाण्यात आणल्या आहेत. संबंधितांनी आणखी काही दुचाकी चोरी केल्या आहेत किंवा नाही, या अनुषंगाने पोलीसांनी पुढील तपासाला आता गती दिली आहे. या निमित्ताने दुचाकी चोरांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. दरम्यान, अमळनेर पोलीसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत एका वेळी तब्बल २४ दुचाकी जप्त करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.