नाशिक : फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी २० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या हवालदाराविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदाराचा चॉकलेट बिस्कीटचा व्यवसाय असून अंबड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात फसवणूक केल्याचा तक्रार अर्ज आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि अर्ज निकाली काढण्यासाठी हवालदार उमाकांत टिळेकरने २० हजार रुपयांची मागणी केली. यासाठी शनिवारी सायंकाळी पाच वाजता अंबड पोलीस ठाण्यात पैसे घेऊन येण्यास सांगितले.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधल्यावर विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता टिळेकरने तक्रारदाराकडे साहेबाच्या नावाचा प्रभाव टाकून साहेबांसाठी २० हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे आढळून आल्याने टिळेकरविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलिसांच्या वतीने टिळेकरच्या घराची झडती घेण्यात येत आहे. टिळेकरचा भ्रमणध्वनी ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक अतुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये विनोद चौधरी, अनिल गांगोडे यांनी भाग घेतला.
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख शर्मिष्ठा वालावलकर यांनी केले आहे.