निफाड तालुक्यासह राज्यात सर्वत्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष उत्पादक अक्षरशः उध्वस्त झाले असून सरसकट पंचनामे करून तातडीने एकरी एक लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. तीन-चार दिवसांपासून अवकाळी पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक उदध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडत असल्याने यंत्रणेची पंचनामा करतांना धावपळ उडत आहे. अवकाळीग्रस्त भागासाठी होणारे राजकीय पर्यटन कामकाजात अडथळा ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी विरोधकांनी आवाज उठविल्यावर कृषिमंत्री अब्दुल सत्तार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. बुधवारी विरोधी पक्षनेते दानवे यांनी चांदोरी परिसरातील काही शेतकऱ्यांशी संवाद साधला. चांदोरी येथे निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या समवेत बाळासाहेब आहेर या द्राक्ष उत्पादकाच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेची त्यांनी पाहणी केली. चांदोरी येथील कांदा उत्पादक सोमनाथ सोनवणे यांच्या कांद्याची पाहणी केली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांनी द्राक्षबागेसह कांदा, गहू, भाजीपाला या पिकांची पाहणी करत सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. कांदा उत्पादकांना ३५० रुपये प्रति क्विंटल अनुदान देवून थट्टा केली आहे. राज्यात सर्वत्र अवकाळीने आस्मानी संकट कोसळले असतानाही शिंदे सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणे घेणे नसून डिसेंबरमधे जाहीर केलेली मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसल्याची टीका दानवे यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत निफाड तालुकाप्रमुख सुधीर कराड, चांदोरीचे सरपंच विनायक खरात, माजी सरपंच संदीप टर्ले, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambadas danve demand to pay rs 1 lakh immediately to farmers affected with unseasonal rain zws
First published on: 13-04-2023 at 05:19 IST