नाशिक : महायुतीतील संघर्षामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नसताना महाराष्ट्र दिनी नाशिक जिल्हा मुख्यालयाचा ध्वज वंदन सोहळा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असल्याचे निश्चित झाले आहे. पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत असणारे शिंदे गटाचे दुसरे मंत्री तथा शिक्षणमंत्री दादा भुसे हे अमरावती येथील ध्वजवंदन सोहळ्यास उपस्थित राहतील.
महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन वर्धापनदिनाचा कार्यक्रम गुरुवारी होणार आहे. यादिवशी ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाचवेळी म्हणजे सकाळी आठ वाजता आयोजित करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. महाराष्ट्र दिन समीप येऊनही नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा पेच काही सुटलेला नाही. त्यामुळे ध्वजवंदन कोणाच्या उपस्थितीत होणार, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. सत्ताधारी तीनही पक्षांमध्ये नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. प्रारंभी जाहीर झालेल्या गिरीश महाजन यांच्या नावाला त्यामुळेच स्थगिती द्यावी लागली. त्यास तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही महायुतीत पालकमंत्रीपद कुणाला द्यायचे, यावर मतैक्य होऊ शकलेले नाही.
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे (अजित पवार) सात आमदार असून त्यांनी आधीपासून नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा सांगितला होता. या पक्षाचे एक मंत्री माणिक कोकाटे यांना नंदुरबार तर दुसरे मंत्री नरहरी झिरवळ यांना हिंगोलीचे पालकमंत्रीपद दिले गेले. भाजपचे जिल्ह्यात पाच आमदार असूनही एकालाही मंत्रिपद मिळालेले नाही. पक्षाने नाशिकच्या पालकमंत्रीपदावर महाजन यांच्यासाठी दावा कायम ठेवला आहे. जिल्ह्यात दोन आमदार असणाऱ्या शिवसेनेने (एकनाथ शिंदे) नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केल्यामुळे हा पेच अधिक गुंतागुंतीचा झाला. मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात पालकमंत्रीपदाचा विषय मार्गी लागेल, अशी आशा भाजपच्या वर्तुळातून व्यक्त झाली. मात्र, तसेही काही घडले. या एकंदर परिस्थितीत महाराष्ट्र दिनी नाशिकचा ध्वजवंदन सोहळा गिरीश महाजन तर, अमरावतीचा सोहळा शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे परिपत्रक शासनाने काढले आहे