सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची सूचना

कृषिमालाच्या व्यवहारात शेतकऱ्यांना मिळणारे धनादेश वटण्यामागे वेळ जाऊन रक्कम थकीत राहण्याचे प्रमाण वाढते. यामुळे

कांदा उत्पादकांच्या खात्यात मालाच्या विक्रीची रक्कम थेट जमा करावी. यासाठी व्यापारी आणि बँकांनी आरटीजीएस पद्धतीचा वापर करावा, अशी सूचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. काही कारणास्तव अर्ज भरू न शकलेल्या पात्र शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील, असेही त्यांनी सूचित केले.

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सहकार विभागाच्या आढावा बैठकीस त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी खा. हरिश्चंद्र चव्हाण, डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे या आमदारांसह जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) निळकंठ करे,     जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर आदी उपस्थित होते. आतापर्यंत २५ जिल्ह्य़ातील कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला आहे. अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा देतानाच त्यांचे उत्पन्न वाढीसाठी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात असल्याचे देशमुख यांनी सांगितले. चांगला भाव आल्यानंतर शेतकऱ्यांनी माल विकायला हवा. यासाठी शेतमाल तारण योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. कांदा, मका, गहू तसेच भाजीपाल्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. करे यांनी विविध योजनांची माहिती दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाबाबत बकाल यांनी सादरीकरण केले. बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती घेऊन बँकेच्या मागणीबद्दल सकारात्मक विचार करण्यात येईल, असे देशमुख यांनी नमूद केले.

नियामक मंडळाची स्थापना

पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या हित संरक्षणासाठी कायद्यात बदल केले असून यासाठी स्थैर्य निधी निर्माण केला जाईल. सहकारी संस्थांवर नियंत्रणासाठी नियामक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध कार्यकारी सहकारी विकास संस्थांनी नवीन व्यवसायांमध्ये उतरून गावातील उत्पन्नांचे स्रोत वाढवावेत, यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे.