जळगाव – अंकलेश्‍वर ते बर्‍हाणपूर या महामार्ग चौपदरीकरण कामाची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी शासनस्तरावर भूसंपादनाबाबत जिल्ह्यात सक्षम प्राधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकीकडे कामास गती मिळण्याच्या हालचाली, तर दुसरीकडे चौपदरीकरणातून रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा या शहरांना वगळल्यामुळे परिसरातून जोरदार विरोध होऊ लागला आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते व महामार्ग विकासमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदनातून तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

धुळे येथील राष्ट्रीय महामार्ग विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या पत्रान्वये अमळनेर, भुसावळ आणि फैजपूर या भागांच्या उपविभागीय अधिकार्‍यांची राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ तळोदा ते बर्‍हाणपूरदरम्यान चौपदरीकरणासाठी भूसंपादनाकरिता सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर ते गुजरात राज्यातील अंकलेश्‍वर शहर जोडणार्‍या प्रस्तावित महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मंजूर झाले आहे. शासनस्तरावर आवश्यक भूसंपादनाच्या हालचाली गतीने सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात परिपत्रक जारी झाले आहे. त्यात जेथून महामार्ग जाणार आहे, त्या गावांची नावे देण्यात आली आहेत. महामार्ग जळगाव जिल्ह्यातील यावल, सावदा, फैजपूर आणि रावेर या शहरांना वळसा घालून जाणार असल्याने त्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक श्रीराम पाटील यांनी निवेदनातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा – नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ७४ टक्क्यांवर, गतवर्षीच्या तुलनेत २३ टक्के कमी पाणी

भूसंपादनासाठी रावेर, यावल, फैजपूर व सावदा या शहरांना वगळून ग्रामीण क्षेत्रामार्गे महामार्ग मुक्ताईनगर तालुक्याला जोडला जात आहे. पूर्वीपासून अंकलेश्‍वर- बर्‍हाणपूर राज्यमार्ग क्रमांक चार वापरात आहे. तो फैजपूर- सावदा-रावेर ते राज्याची सीमा असलेले चोरवडमार्गे बर्‍हाणपूर असा जात आहे. त्यावर परिवहन नाकेही आहेत. रावेर, यावल, सावदा व फैजपूर परिसर केळी उत्पादन व व्यापारीपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. असे असूनही या परिसराला दळणवळण व व्यवसायापासून वंचित ठेवण्यात येत आहे. रावेर, सावदा व फैजपूरमधूनच सर्वाधिक केळी निर्यात केली जाते. असे असतानाही चौपदरीकरणाचे भूसंपादन वेगळ्या दिशेने होत असून, हा शेतकर्‍यांचा सहनशीलतेचा अंत आहे. चौपदरीकरण रावेर, सावदा, फैजपूर या शहरांतून किंवा शहरालगत झाले पाहिजे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उद्योजक श्रीराम पाटील यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांना रावेरच्या तहसीलदारांमार्फत निवेदनातून देण्यात आला आहे.

हेही वाचा – अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवेदन देताना उद्योजक पाटील यांसह माजी उपनगराध्यक्ष रफिक, रावेर पीपल्स बँकेचे संचालक सोपान पाटील, शेख मेहमूद शेख हसन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आत्माराम कोळी, माजी सरपंच अतुल पाटील, सीताराम पाटील आदी उपस्थित होते.